अंबाजोगाई : खातेदाराच्या नावाची बनावट विड्रॉल स्लीप तयार करून त्यावर खोट्या सह्या केल्या आणि खात्यातून ११ लाख ८६ हजार ४८२ रुपये काढून घेतल्याच्या आरोपावरून अंबाजोगाई येथील शीतल ग्रामीण बिगर शेती नागरी सह.पतसंस्थेच्या अध्यक्षासह संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
धर्मराज किसनराव बिरगड (रा. चिचखंडी, ता. अंबाजोगाई) यांचे अंबाजोगाईच्या मोंढ्यात आडत दुकान आहे. त्यांनी २०१९ साली चौसाळकर कॉलनीतील शीतल ग्रामीण बिगर शेती नागरी सह.पतसंस्थेत खाते काढले होते. १४ ते १८ मार्च २०१९ या चार दिवसांच्या कालावधीत त्यांनी खात्यामध्ये एकूण ११ लाख ८६ हजार ४८२ रुपये रक्कम जमा केली. १ एप्रिल २०१९ रोजी ते ही रक्कम काढण्यासाठी गेले असता दोन-चार दिवसात रक्कम देऊत असे शाखाधिकारी नवनाथ वैजनाथ बिरंगे आणि सचिव संगीता प्रकाश आपेट यांनी सांगितले. त्यानंतर अनेकदा मागणी करूनही रक्कम देण्यात आली नाही. अखेर धर्मराज बिरगड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला. तेव्हा ७ सप्टेंबर २०१९ रोजी संगीता आपेट यांनी सध्या पतसंस्था आर्थिक अडचणीत असल्याने अडीच महिन्यात बिरगड यांची सर्व रक्कम परत करूत असा लेखी जवाब दिला. मात्र आजपावेतो बिरगड यांना कसलीही रक्कम मिळाली नाही. दरम्यानच्या काळात सहकारी संस्थेचे सहायक निबंधकांनी पतसंस्थेस नोटीस पाठविली. त्यानंतर २३ एप्रिल २०१९ रोजी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने बिरगड यांचे परस्पर त्यांच्या नावाने बनावट विड्रॉल स्लीप तयार करून त्यांच्या खोट्या सह्या केल्या आणि खात्यातून ११ लाख ८६ हजार ४८२ रुपये काढून घेतले. त्यानंतर ती बनावट स्लीप सहा. निबंधकाच्या कार्यालयात सादर करून खरी असल्याचे भासवले असे धर्मराज बिरगड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून पतसंस्थेचा अध्यक्ष प्रकाश विठ्ठल आपेट, सचिव संगीता आपेट, संचालक सतीश दत्तात्रय आपेट, प्रयागबाई विठ्ठल आपेट, दत्तू दगडू आपेट, विठ्ठल मारोती आपेट, बाबूराव आबाराव आपेट, भालचंद्र साहेबराव आपेट, नागनाथ रामूअप्पा तोडकर, व्यवस्थापक नवनाथ बिरंगे, रोखपाल अशोक उनवणे, लिपिक सचिन हनुमंत उपाडे, शर्मिला लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.