माजलगाव
: गुलामाप्रमाणे राबवून कामाचा मोबदला न देणाऱ्या आणि चार दिवसांपासून उपाशी ठेवणाऱ्या मुकादमाच्या तावडीतून मध्य प्रदेशातील १२ उसतोड कामगार व त्यांच्या ७ मुलांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जिल्हा सरकारी कामगार अधिकारी व दिंद्रुडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तालुक्यातील चाटगाव परिसरात ही कारवाई केली.
माजलगाव तालुक्यातील चाटगांव परिसरात मध्यप्रदेशमधील उसतोड कामगार ऊस तोडणीसाठी दोन महिन्यांपासून आलेले आहेत. माजलगाव तालुक्याबाहेरील कारखान्याकडून या भागात ऊसतोडणी सुरू आहे. त्यांच्या मुकादमाकडून मागील ५-६ दिवसांपासून कामगारांचा छळ सुरू होता. दैनंदिन कामापेक्षा जास्त काम व त्याचे पैसे न दिल्याने या कामगारांची उपासमार सुरू होती. संबंधित मुकादमाकडून त्यांना डांबून ठेवल्यासारखी वागणूक मिळत होती.
त्यामुळे या कामगारांनी ही माहिती त्यांच्या मध्य प्रदेशमधील गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला आदेश दिल्यानंतर गतीने कार्यवाही झाली. सरकारी कामगार अधिकारी एस.पी.राजपूत , दिंद्रुडचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून मुकादमाच्या तावडीतून ऊस तोडणी कामगारांसह मुलांची सुटका केली. गुरुवारी रात्री उशिरा या कामगारांना माजलगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्यानंतर त्यांचे जेवण व राहण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर कामगार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत यात मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे कामगार अधिकारी राजपूत यांनी सांगितले.