पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील दोन सहकारी व एका खासगी अशा एकूण तीन साखर कारखान्यांनी मागील साडेतीन महिन्यात बारा लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले. याव्दारे जवळपास ११ लाख पोती साखरेचे उत्पादन करण्यात आले, तर तिन्ही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा साडेनऊ इतका आला आहे. कार्यक्षेत्रात आणखी शिल्लक ऊस पाहता हे तिन्ही कारखाने पुढील दोन महिने चालतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
माजलगाव शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील तेलगाव येथे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना तसेच पवारवाडी येथील खासगी जयमहेश शुगर हे तीन कारखाने आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास १८ हजार हेक्टरवर क्षेत्रावर उसाची लागवड झालेली होती. यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतात ओल असल्याने ऊस तोडणी करताना अडचणी येत असल्याने उसाचे गाळप उशिरा सुरू झाले. माजलगाव परिसरातून सुरुवातीपासूनच तालुक्याबाहेरील अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपास नेला व सध्या ते घेऊन जात आहेत.
जयमहेश शुगरची सर्वात जास्त गाळप क्षमता असून, त्यापाठोपाठ सोळंके सहकारी साखर कारखाना व त्यानंतर अत्यंत कमी गाळप क्षमता असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यावर्षी अतिशय चांगल्या प्रमाणात गाळप केलेले आहे. या तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत १२ लाख ३५ हजार ३३२ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. या तिन्ही कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.५८ एवढा आहे. यात आणखी वाढ होईल, असे कारखान्यांकडून सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढे गाळप झाले आहे. सध्या ४० ते ४५ टक्के ऊस शिल्लक असल्याचे सोळंके कारखान्याचे सचिव सुरेश लगड यांनी सांगितले. यामुळे २२ लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त गाळप हे तीन कारखाने करू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
साडेतीन महिन्यातील गाळप
कारखाना गाळप उत्पादन साखर उतारा
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखाना - ४,६१,७०० मे. टन - ३ लाख २२ हजार ८०० क्विंटल ९.६५
छत्रपती सहकारी साखर कारखाना - २,११,८४० मे. टन १ लाख ९५ हजार २२५ क्विंटल - ९.२५
जयमहेश शुगर्स - ५,६१,७९२ मे. टन ५ लाख ४२ हजार ५८५ क्विंटल - ९.८४
यावर्षी कारखाना सुरू होऊन १०० दिवस झाले असून, आणखी १०० दिवस कारखाना चालेल इतका ऊस शिल्लक असल्याने आमचा कारखाना साडेनऊ लाखापर्यंत गाळप करू शकतो. यावर्षी साखरेचा उतारा पण चांगला असून, यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव देता येईल.
--- धैर्यशील सोळंके, चेअरमन
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना.