नानजिंग (चीन) - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बीने दणक्यात सुरूवात करताना आयर्लंडच्या नॅहाट नीजुयेनचा 21-15, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याने 37 मिनिटांत हा विजय मिळवला. पुढील फेरीत त्याला स्पेनच्या पॅब्लो अॅबियनचा सामना करावा लागणार आहे. सायना नेहवालनेही टर्कीच्या अॅली डेमिर्बगचा 21-17, 21-8 असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज यांनी चुरशीच्या लढतीत जर्मनीच्या मार्क लॅम्प्फुस व इसाबेल हर्टरिच यांचे आव्हान 10-21, 21-17, 21-18 असा पराभव केला.
पुरूष दुहेरीत भारताच्या अर्जुन एम. आर. आणि रामचंद्रन श्लोक आणि मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या फैझल हफीज आणि ग्लोरिया इमॅन्युएले यांनी 21-16, 21-4 अशा फरकाने चोप्रा व रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आणले. सीन येव ओंग आणि यी टेओ या मलेशियन जोडीने 21-14, 21-15 अशा फरकाने अर्जुन आणि रामचंद्रन यांना पराभूत केले.
पुरूष दुहेरीत तरूण कोना आणि सौरभ शर्मा यांना कडव्या संघर्षानंतरही स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. हाँगकाँगच्या चूंग चीन ओर व मान चून टँग यांनी भारतीय खेळाडूंवर 22-20, 18-21, 21-17 असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीच्या दुस-या लढतीत रोहन कपूर व कुहू गर्ग यांना इंग्लंडच्या क्रिस अॅडकॉक आणि गॅब्रियल अॅडकॉक या जोडीकडून 12-21, 12-21 अशी हार मानावी लागली.