बुलेटची क्रेझ कोणाला नाही, तिचा सायलेन्सर बदलून फटफटी सारखा कानाचे पडदे फाडणारा आवाज करत हे बुलेट प्रेमी अगदी शहरातूनही जात असतात. आता पोलीस कारवाई करू लागलेत त्यामुळे असे नग कमी होऊ लागले आहेत. आता तर बुलेट बनविणाऱ्या रॉयल एनफिल्डने शॉटगन ६५० नावाची एक जबरदस्त रंगात असलेली बुलेट लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही लिमिटेड एडिशन असून फक्त १०० मोटरसायकली बनविल्या जाणार आहेत. यातही काटछाट म्हणून फक्त २५ शॉटगन बुलेट या भारतासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
ब्रिटिश ऑटोमेकर असलेल्या या कंपनीने भारतीय बाजारात केवळ २५ मोटरसायकली ठेवल्या आहेत. ही बाईक आयकॉन मोटरस्पोर्टसोबत मिळून लाँच करण्यात आली आहे. या आयकॉन एडिशनच्या केवळ १०० युनिट बनविण्यात आल्या आहेत. सव्वा चार लाखांच्या या मोटरसायकलच्या खरेदीसाठी हे बुलेट प्रेमी तुटून पडले आहेत.
या बाईकला तीन कलर कॉम्बिनेशनमध्ये लाँच करण्यात आले आहे. ही मोटरसायकल EICMA 2024 आणि मोटोवर्स 2024 मध्ये दाखविण्यात आली होती. या बाईकच्या प्रत्येक भागाला आकर्षक करण्यासाठी वेगवेगळा रंग देण्यात आला आहे. लाल सीट, निळे शॉक ऑब्झर्व्हर, गोल्डन व्हील्स आणि बार एंड मिरर लावण्यात आले आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे ही बाईक चालविण्यासाठी तिच्या रंगाच्या हिशेबाने एक जॅकेटही देण्यात आले आहे.
रॉयल एनफील्ड शॉटगन 650 च्या लिमिटेड एडिशनपेक्षा या मोटरसायकलची किंमत ६६ हजार रुपयांनी जास्त आहे. या नव्या रंगीबेरंगी मोटरसायकलचे २५ युनिट भारतात पोहोचले आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला कंपनी त्या भाग्यवान २५ जणांचे नाव जाहीर करणार आहे.