नवी दिल्ली - केंद्र सरकारमधील एनडीए सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटी दरात कपात करून मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट दिली आहे. जीएसटीतील बदलामुळे अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहेत. याआधी जीएसटीमध्ये ४ स्लॅब होते, आता केवळ २ स्लॅब असतील. ५ टक्के आणि १८ टक्के या दरानेच जीएसटी आकारला जाईल. दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बाजारातील अनेक वस्तू आणि सेवांच्या किंमतीत घट होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
जीएसटी कपातीचा परिणाम कार आणि बाइक्सच्या किंमतीवरही होणार आहे. कारण वाहनाचा आकार आणि इंजिन क्षमता यानुसार अनेक वाहनांवरील २८ टक्के जीएसटी दर कपात करून १८ टक्क्यांपर्यंत आणण्यात आला आहे. नवीन जीएसटी स्लॅब येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होतील. त्यामुळे जर तुम्ही दसरा किंवा दिवाळीला नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅनिंग करणार असाल, तर तुमच्यासाठी कोणती कार आणि बाईक फायदेशीर ठरेल हे जाणून घ्या
छोट्या आणि लग्झरी कारवर GST
GST मधील सुधारित नियमानुसार, छोट्या कार ज्यांची इंजिन क्षमता १२०० सीसीपर्यंत पेट्रोल आणि १५०० सीसीपर्यंत डिझेल इंजिन आहे, त्याची लांबी ४ मीटरपेक्षा कमी आहे अशा कारवर १८ टक्के जीएसटी लागणार आहे. जो याआधी २८ टक्के इतका होता. देशात अनेक हॅचबॅक, कॉम्पॅक्ट एसयूवी आणि सेडान कार आहेत, ज्या १८ टक्के जीएसटी यादीत येणार आहेत. ज्यात मारूती सुजुकीचा पोर्टफोलिया तगडा आहे. मारूती स्विफ्ट, वॅगनआर, बेलेनो, इग्निस, ब्रेजा, हुंडई वेन्यू, आय १०, आय २०, किआ सॉनेट, टाटा नेक्सन, पंच, टिगोर आणि टिएगोसारख्या कारचा समावेश आहे. या कारच्या किंमती ५ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारवर GST
मोठ्या इंजिन क्षमतेसह येणाऱ्या हायब्रिड कार म्हणजेच इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड खरेदी करणे नव्या नियमानुसार महागणार आहे. हायब्रिड कार १५०० सीसी इंजिन आणि ४ मीटर पेक्षा कमी लांबी असेल त्यांच्यावर १८ टक्के जीएसटी लागू असेल परंतु जी वाहने यापेक्षा जास्त क्षमतेची आणि लांबी अधिक आहे त्यांना ४० टक्के स्लॅबमध्ये टाकले आहे. त्यामुळे हायब्रिड कार महागणार आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही. यावर पहिल्यासारखेच ५ टक्के स्लॅब आकारला जाईल. मोठ्या एसयूवी आणि लग्झरी कार ज्यांची इंजिन क्षमता १५०० सीसीपेक्षा अधिक आहे, लांबी ४ मीटर आणि ग्राऊंड क्लीयरेंस १७० मिमीपेक्षा जास्त आहे त्यांच्यावर ४० टक्के जीएसटी आणि सोबतच २२ टक्के सेस आकारला जाणार आहे. पहिले या वाहनांवर २८ टक्के जीएसटीसह सेस आकारला जात होता. त्यामुळे या वाहनांच्या किंमती महाग होणार आहेत.
मध्यमवर्गीयांना किती लाभ?
जीएसटीमध्ये होणाऱ्या बदलामुळे छोट्या कार खरेदीवर मोठा फायदा होणार आहे. हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेडान आणि कॉम्पॅक्ट एसयूवी सेगमेंटमध्ये सर्वाधिक खरेदी होते. देशातील बहुतांश लोक १.२ लीटर आणि १.५ लीटर इंजिन क्षमता असणारी वाहने खरेदी करतात. त्यामुळे दिवाळीत कार विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे जीएसटीमधील सूट आणि सणांमध्ये मिळणारे ऑफर्स यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशातील पैसे बऱ्याच प्रमाणात वाचणार आहेत.