जगातील सर्वात मोठी कंपनी फोक्सवॅगनने भारतात करचोरी केल्याचे आरोप असताना आता आणखी एका कंपनीने करचोरी केल्याचे समोर आले आहे. दक्षिण कोरियाच्या किया मोटर्सने भारताचा १३.५ अब्ज रुपयांचा कर चोरला असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारत सरकारने किया मोटर्सला नोटीस पाठविली आहे. फोक्सवॅगनने जो मार्ग पत्करला तोच मार्ग कियाने देखील वापरला आहे. अर्थात दोन्ही कंपन्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. फोक्सवॅगन नुकतीच या नोटीस विरोधात कोर्टात गेली आहे.
कस्टम ड्युटी वाचविण्यासाठी कियाने आयात केलेल्या मालाला चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. फोक्सवॅगनने जवळजवळ पूर्ण कार अनसेम्बल स्थितीत आयात केली. भारतातील CKD किंवा पूर्णपणे तयार युनिट्सच्या नियमांनुसार 30-35 टक्के आयात कर आकारला जातो. परंतू या आयात सुट्या भागांना वैयक्तीक भाग म्हणून घोषित करून व चुकीचे वर्गीकरण करून कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा आकडा १.४ अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड होता.
भारतीय कर अधिकाऱ्यांनी किआच्या भारतीय युनिटला एप्रिल २०२४ मध्येच नोटीस पाठविली होती. किआने त्यांच्या कार्निव्हल मिनीव्हॅन असेंबल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांच्या आयातीची चुकीची नोंद केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला होता. कंपनीने संपूर्ण वाहन मागविण्याऐवजी त्याचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळ्या ऑर्डर देऊन मागविले. यामुळे कमी कर लागला, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
भारतातील CKD किंवा पूर्णपणे तयार युनिट्सच्या नियमांनुसार 30-35 टक्के आयात कर आकारला जातो. तर सुट्या पार्टवर १० ते १५ टक्केच कर भरावा लागतो. याचाच फायदा या परदेशी कंपन्यांनी उचलल्याचे सरकारचे म्हणणे आहे. भारताच्या अर्थ मंत्रालयाने आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतू कियाने या नोटीसीनंतर त्याला विरोध दर्शवत २.७८ अब्ज रुपये जमा केले आहेत. तसेच नोटीसविरोधात आपली कारवाई सुरु असल्याचे कियाचे म्हणणे आहे.