नरेंद्र जावरे - चिखलदरामेळघाटातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये पळविण्याच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पंचायत समितीने (पं.स.) गुरूवारी तातडीची बैठक बोलविल्याने संबंधित मुख्याध्यापकाचे धाबे दणाणले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शारदा ज्ञान मंदिर शाळेत दोन स्कूल बसमध्ये मेळघाटातून विद्यार्थी जनावरांप्रमाणे कोंबून नेले जात होते. २८ प्रवासी आसन क्षमता असताना १५५ विद्यार्थी या दोन स्कूल बसमध्ये कोंबले होते. मागील दोन दिवसांपासून ‘लोकमत’ने प्रकरण लावून धरल्याने आदिवासी विभागासह पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खळबळ उडाली आहे.आदिवासी अनुसूचित आश्रम शाळा संहितेनुसार दहा किलोमीटर परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेत शिकविण्यासाठी नेताना प्रकल्प अधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता असते. परंतु नागपूर, बल्लारशा, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणी विद्यार्थ्यांची पळवापळवी नियमबाह्यरित्या केली जात आहे. आज मंगळवारी दुपारी प्रकल्प कार्यालयाचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सेलू येथील शारदा ज्ञान मंदिरच्या दोन्ही बसमध्ये विद्यार्थी नेण्याची तात्पुरती परवानगी दिली. पहिली, चौथी व सातवीचे विद्यार्थी मेळघाटबाहेर नेता येत नाहीत. मेळघाटातील आश्रमशाळा ओस पडल्या असताना शासनाच्या त्याच योजनेचा लाभ दुसऱ्या जिल्ह्यात देता येत असेल मेळघाटातील आश्रमशाळा बंद पडण्याची वेळ याप्रकरणाने पुढे आली आहे. डोमा आश्रमशाळेचा गैरप्रकारसेलू येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या चौकशीसाठी डोमा येथील आश्रमशाळेत गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर याच शासकीय आश्रमशाळेतील भोंगळ कारभार दृष्टीस पडला. तेथील मुख्याध्यापकासह काही शिक्षक बेपत्ता होते. जे शिक्षक सकाळी आले ते स्वाक्षरी करुन निघून गेले. यावर शिक्षकांची कानउघाडणी केली.
मेळघाटातील जिल्हा परिषद शाळांची होणार तपासणी
By admin | Updated: July 8, 2014 23:13 IST