लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षसुद्धा याच महाराष्ट्र विकास आघाडीचा होणार असल्याचे तूर्त तरी दिसून येत आहे. तसेच अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून मोर्चेबांधणीला वेग येणार असल्याचे संकेत आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यात हे पद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील सदस्याला या पदावर विराजमान होता येणार आहे. त्यातच सलग पाच वर्षे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी हे पद राखीव होते. त्यापूर्वीच्या पाच वर्षांनंतर पुन्हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण राज्यात सत्तास्थापनेसाठी नेमके कोणते पक्ष एकत्र येणार याबाबत तेव्हा कोणतेही चित्र स्पष्ट नसल्याने सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते संभ्रमावस्थेत होते. काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असल्याने या पक्षाचा अध्यक्ष होईल हे खरे असले तरी बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी या पक्षाला टेकूची गरज आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाल्याने आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, अशी समीकरणे यापूर्वीही जिल्हा परिषदेत सत्तेत होतीच. तेच समीकरणे आता यावेळीही कायम राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे जिल्हा परिषदेतही महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष होतील, यात कुठलीही शंका करण्याचे कारण नाही. या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणाची नांदी जिल्हा परिषदेतही राज्यातील सत्ता स्थापनेनंतर लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पक्ष स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी अध्यक्षपदासाठी इच्छुकांचा मोर्चेबांधणीचा मार्गही राज्यातील स्थापनेनंतर मोकळा झाला आहे. आता आपल्या पक्षाच्या 'गॉडफादर'कडे फिल्डिंग लावण्याच्या कामालाही वेग येणार आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश राहणार असून अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.भाजपच्या भूमिकेकडे लक्षजिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसंदर्भात अद्याप आपली भूमिका काय, याबाबत अद्याप चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा गुंता सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यात हे पद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील सदस्याला या पदावर विराजमान होता येणार आहे. त्यातच सलग पाच वर्षे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी हे पद राखीव होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा गुंता सुटला
ठळक मुद्देमोर्चेबांधणी : महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा