पालक होताहेत कंगाल, शिक्षणसम्राट मालामाल : पालकांचा कल इंग्रजी शाळांकडेसुनील देशपांडे अचलपूरतालुक्यात खासगी शाळांसोबत इंग्रजी शाळांचे प्रश्न वाढत असल्याने प्रस्तावित शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता ओस पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे असून त्याचा फायदा काही शिक्षण सम्राटांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ही धोक्याची घंटा असून काही शाळा रिकाम्या होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा या सामान्य व्यक्ती, शेतकरी शेतमजूर यांच्या पाल्यांच्या भरवश्यावर चालत होत्या. मात्र आता बहुतंशी ओढ या शाळांकडे आहे. ग्रामीण भागातील पालक अचलपूर-परतवाड्यातील नामांकीत शाळेत गलेलठ्ठ देणगी (डोनेशन) देऊन त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी व शिक्षक जास्त असा प्रकार बघायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील १२९ जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या काही गावांमध्ये जि.प. शाळांत पहिल्या वर्गात कमी विद्यार्थी असल्याची विश्वासनीय माहिती आहे.मागील ७ ते ८ वर्षांत खासगी शिक्षण संस्था चालकांनी मोठया प्रमाणात इंग्रजी माध्यमाची सोय केली. आपलाही पाल्य जगाच्या स्पर्धेत उतरावा, असे गरीब व निरक्षर पालकांना वाटायला लागले असून त्याला शिक्षणाचेही महत्त्व कळले आहे. त्यात इंग्रजी ही जागतिक भाषा मानली जात असल्याने पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे अधिक आहे. १५ ते २० वर्षे अगोदर इंग्रजी माध्यमाची सोय तालुक्यात नव्हती. मात्र मागील ८ ते १० वर्षांत नर्सरी ते ५ व्या वर्गापर्यंतची सोय अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील गावांमध्ये झाली आहे. शहरातील काही शिक्षणसम्राटांनी तर दुकानदाऱ्या थाटल्या आहेत. मनमानी फी आकारुन देणग्यांच्या नावाने पैसा उकळला जात आहे. शिखणाचे अक्षरश: बाजारीकरण होत असून गोरगरीबांच्या पालकांचे शासन आहे की, नाही असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षक उन्हाळ्याच्या सुटीत मौजमजेत असताना या संधीचा फायदा घेत खासगी शिक्षण सम्राटांनी मोठया प्रमाणात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी पळविले आहेत. काही पालकांनी काहीना काही कारण सांगून जिल्हा परिषदेच्या शाळेतून आपल्या पाल्याचे नाव काढून खासगी शाळेत दाखल केले आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना घरघर लागली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत विनामूल्य शिक्षण मिळत आहे, तर दुसरीकडे खासगी शाळेत पैसा मोजावा लागत आहे. तरीही पालकांची ओढ खासगी शाळांकडेच आहे. त्यामुळे काही खासगी शिक्षण संस्थाचालक मालामाल झाले आहेत. याची शासनाच्या गुप्तचर विभागाने माहिती घेऊन संपत्तीची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे जनतेचे मत आहे. पाल्यांना चांगले शिक्षण मिळविण्यााठी पालक कंगाल आणि ठराविक संस्थाचालक मालामाल या तत्वाला शासनाचे धोरण कारणीभूत असून मोठया प्रमाणात देणग्या घेणाऱ्या शाळांवर शासनाने आजपर्यंत कारवाई केलेली नसल्याने शिक्षण सम्राटांचे पावत आहे, असे पालक वर्गाचे म्हणणे आहे.
झेडपीच्या शाळांना धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 00:15 IST