अमरावती : राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये २३ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. मात्र, २० दिवसांनंतरही शाळांना विद्यार्थी, पालकांचा फारसा प्रतिसाद नाही. अद्यापपर्यंत शून्य उपस्थितीची नोंद, जिल्ह्यात ५४८ पैकी २५० शाळांमध्ये शून्य उपस्थिती असल्याचे वास्तव चित्र आहे.
शासन आदेशाप्रमाणे शासकीय, खासगी, निमशासकीय शाळांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले. कोरोना नियमावलींचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू केल्यात. गणित, विज्ञान व इंग्रजी अभ्यासक्रमांचे धडे विद्यार्थ्यांना घेता यावे, यासाठी दिवसाआड वर्ग शिकवणींना प्राधान्य देण्यात आले. विषयनिहाय शिक्षकांचे नियोजनदेखील शाळा संचालक, मुख्याध्यापकामार्फत करण्यात आले. परंतु, पालक मुलांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नसल्याचे वास्तव शिक्षण विभागाच्या फिरत्या पथकाने शाळांवर भेटी दिल्या असता दिसून आले. बहुतांश पालकांना कोरोना लसीनंतरच शाळेत मुलांना पाठवू, अशी मनाची तयारी केली आहे. एवढेच नव्हे तर अमरावती महानगरातील विद्यार्थी संख्येने अधिक असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे शाळेत ऑफलाईन शिक्षणास नकार दिला जात आहे. २० दिवस ओलांडुनही शाळांमध्ये गर्दी नसल्याचे चित्र आहे.
------------------------------------
शिक्षकांमध्ये कोरोनाची भीती
कोरोना संसर्ग ओसरत चालला असताना शिक्षकांमध्ये कमालीची भीती दिसून येत आहे. स्थानिक काही शाळांमध्ये शिक्षक शिकवणीचे तर दूरच कागदालाही हात लावत नाही. पालक, विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबत असलेली भीती दूर करण्याऐवजी शिक्षकांचे असे वागणे बघून बहुतांश पालकांनी शाळांमध्ये मुलांना अध्ययनास पाठविण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.
-------------------------
जिल्ह्यात ५४८ शाळांपैकी २५० शाळांमध्ये २० दिवसांत एकही विद्यार्थी आले नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातही कोरोना संसर्गाची भीती आहे. ग्रामीणमध्ये तरी १०, २० विद्यार्थी येत असून, शहरातील शाळांचा ऑनलाईन शिक्षणावर भर आहे.
- वामन बोलके, शिक्षणाधिकारी, अमरावती.
--------------------
शिक्षणापेक्षा मुलांचा जीव महत्त्वाचा आहे. अद्यापही कोरोना गेला नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे पालक म्हणून कर्तव्य आहे. नवीन वर्षात कोरोना लस आल्यानंतर मुलांना शाळेत पाठवू.
- संध्या खांडेकर, पालक, अमरावती