नांदगाव पेठ : नजीकच्या बोर नदी प्रकल्पामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून अंत झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. अग्निशमन दलासह रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून रात्री ९ च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. साहिल शाह इस्माईल शाह (रा. आझादनगर, अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मित्रांसह फिरण्यासाठी या प्रकल्पावर आला होता.
शुक्रवारची नमाज अदा करून साहिल शाह हा मित्रांसह बोर नदी प्रकल्पावर फिरावयास आला होता. साहिलच्या मित्रांना पोहणे असल्याने त्यांनी पाण्यात उडी घेऊन पोहण्यास सुरुवात केली. साहिललादेखील पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यानेदेखील अंगातील कपडे काढून पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहणे नसल्याने तो बुडाला. मित्रांनी शोधाशोध केली. परंतु, साहिल पाण्याच्या बाहेर न आल्याने मित्रांनी अखेर कुटुंबीयांना माहिती दिली.
घटनेची माहिती नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल व रेस्क्यू टीमला पाचारण केले. सुरुवातीला अग्निशमन दलाने गळाच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार असल्याने मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. अखेर रेस्क्यू टीमने पाण्यात उडी घेऊन शोधाशोध सुरू केली. रात्री ९ वाजताच्या दरम्यान साहिलचा मृतदेह हाती लागला.
रेस्क्यू टीमच्यावतीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी साहिलचे कुटुंबीय व मित्रांनी एकच आक्रोश केला होता. रेस्क्यू टीमचे हेमंत सरकटे, योगेश घाटगे, कौस्तुभ वैद्य, अर्जुन सुंदरडे, भूषण वैद्य, आकाश निमकर, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, दिपक डोरस, उदय मोरे, महेश मंदारे आदींनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.