लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिव्यांगत्वावरून हिणवल्याने एका कॉलेजकुमाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी अचलपूर तालुक्यातील बळेगाव येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी, सखोल तपासाअंती सरमसपुरा पोलिसांनी १ मार्च रोजी रात्री नागोराव पंजाबराव भोरे (३७, रा. बळेगाव) विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
गोकुळ सुदाम भोरे (रा. बळेगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी, मृताचे वडील सुदाम भोरे यांनी एफआयआर नोंदविला. आरोपीने आपल्या मुलाला नेहमीच मूकबधिरपणावरून त्रास दिला. त्यामुळे गोकुळने आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, अशी फिर्याद मृताच्या पित्याने नोंदविली. एफआयआरनुसार, गोकुळ हा मूकबधिर होता. त्याला बोलताही येत नव्हते. ऐकूदेखील येत नव्हते. तो सन २०२३ मध्ये अचलपुरातील जगदंबा विद्यालयात बीए प्रथम वर्षाला शिकत होता. तो इशाऱ्यानेच कुटुंबीयांना सर्व गोष्टी सांगत होता.
फॉरेन्सिक रिपोर्ट, मोबाइल तपासलासरमसपुरा पोलिसांनी याप्रकरणी मृताचा मोबाइल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला चाचणीला पाठविले होता. तर काही युट्युब व्हिडीओचे ट्रान्सलेशनदेखील करण्यात आले. तो सर्व तांत्रिक तपास व फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
११ फेब्रुवारीची ती काळरात्र११ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास सुदाम भोरे हे बाहेरून घरी परत आले. त्यावेळी गोकुळ याला त्यांनी आवाज दिला. गोकुळने घराचा दरवाजा आतून बंद करून देवघरातील फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सन २०२० पासूनच त्राससन २०२० पासून फिर्यादी सुदाम भोरे यांचा चुलत भाऊ नागोराव भोरे हा गोकुळला त्याच्या दिव्यांगपणावरून इशारे करून त्रास देत होता. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी भोरे हे घरातील एका लग्न समारंभासाठी कुटुंबीयांसह हरम येथे गेले होते. तेथेदेखील आरोपीने गोकुळला त्रास दिल्याने तो रडत होता. त्यामुळे त्याने वडिलांना इशाऱ्यानेच घरी परत चालण्यास सांगितले.