लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात ड्रग्स व अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून, यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय आहे. इतकेच नाहीतर, अमरावतीसारख्या लहान शहरामध्ये मादक पदार्थाच्या तस्करीच्या केसेस वाढत असल्याने त्यांना पोलिस विभागाकडूनच वरदहस्त मिळत आहे का? असा संशय व्यक्त करीत गृहविभागाने यावर कठोर पावले उचलून उपाययोजना करण्याची लक्षवेधी सूचना आ. संजय खोडके यांनी गुरुवारी विधान परिषद सभागृहात मांडली.
राज्यात ड्रग्स व अमली पदार्थाच्या विरोधात शासनाने कठोर धोरण अवलंबले असून, कारवायांबाबत प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. याचे पडसाद विधान परिषद सभागृहातही उमटले. शहरात एकाच वर्षात ड्रग्स व मादक पदार्थ तस्करीची ३१ प्रकरणे समोर आली आहेत आणि जास्तीतजास्त प्रकरणे ही एकाच ठाण्यातंर्गत घडत आहेत. याचा अर्थ एकदा अमली पदार्थांची विक्री करणारा माणूस कार्यवाही होऊनदेखील पुन्हा तोच धंदा करीत आहे. यात एक साखळी निर्माण झाली असून, आता अमली पदार्थ आणण्यासाठी मूळ अड्ड्यावर जाण्याची गरज नसून काही अल्पवयीन मुले थेट अमली पदार्थ पोहोचवित आहेत. अमरावतीत कुठे काय सुरू आहे, त्यात कोण सहभागी आहे हेसुद्धा पोलिसांना माहीत असताना याकडे डोळेझाकपणा व दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघात आ. संजय खोडके यांनी केला.
पालकमंत्री देतील का लक्ष?अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचा मुद्दा गुरुवारी विधिमंडळात गाजला. अमरावतीचे पालकत्व स्वीकारणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे फोफावलेली ड्रग्ज, अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पुढाकार घेणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. लहान-सहान दुकानांवर सहजतेने एमडी ड्रग्ज, गांजा, अमली पदार्थ विक्री होत आहे. तरुणाई नशेच्या आहारी जात असताना ते रोखण्यासाठी पालकमंत्री केव्हा, कसे नियोजन करणार, अशी आर्त हाक पालकांकडून केली जात आहे.
पोलिसांचे सपशेल दुर्लक्षपोलिसांचे खुफिया, बिट जमादार यांना सर्वांना माहित असताना ड्रग्ज़, अमली पदार्थ विक्रीकडे सपेशल दुर्लक्ष केले जाते. अमरावती शहरात वाढत्या ड्रग्स व मादक पदार्थ तस्करीमध्ये पोलिसांकडूनच अभय दिला जात असल्याची शक्यता उपस्थित केली जात आहे.
कठोर धोरण अवलंबण्याचे निर्देशित करू - मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत ड्रग्स व मादक पदार्थ तस्करीच्या वाढत्या प्रकरणी आपण स्वतः पोलिस आयुक्तांशी चर्चा करू. त्यांना याविरोधात कठोर धोरण अवलंबण्याचे निर्देश देऊ. ड्रग्स व मादक पदार्थाबाबत एनडीपीएसअंतर्गत कारवाई करताना कमर्शियल क्वॉन्टिटी संदर्भातही केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू, असे सांगितले.