अमरावती : रेशन दुकानासंदर्भातील एका कामाची दखल घेत नसल्याचा आरोप करून एका २८ वर्षीय महिलेने निवासी नायब तहसीलदारांना मारहाण केली. शिवीगाळदेखील केली. भातकुलीस्थित तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणीला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली. निवासी नायब तहसीलदार विजय मांजरे यांना या प्रकाराला सामोरे जावे लागले.
तक्रारीनुसार, निंभा येथील त्या तरुणीच्या भावाचे रेशन दुकान आहे. त्या दुकानाला अन्य गावातील काही रेशनकार्ड जोडण्याबाबतचा प्रस्ताव भातकुली तहसीलमध्ये टाकण्यात आला. त्या प्रस्तावाच्या निरीक्षणाची जबाबदारी विजय मांजरे यांच्याकडे होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी मांजरे हे तहसील कार्यालयात नियमित कामकाज करीत असताना ती तरुणी त्यांच्या कार्यालयात दाखल झाली. माझ्या प्रकरणाचे काय झाले, अशी विचारणा केली. शाब्दिक वाद होऊन तिने मांजरे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. या घटनेेने तहसील कार्यालयात खळबळ उडाली. लागलीच भातकुुली पोलिसांना पाचारण करण्यात आले. तहसीलदार नीता लबडे यादेखील दाखल झाल्या. याप्रकरणी मांजरे यांनी त्या तरुणीविरूद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिचेविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.
कोट
नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा व अन्य कलमांन्वये गुन्हे नोंदविले. न्यायालयाने संबंधिताची कारागृहात रवानगी केली.
- विजयकुमार वाकसे, ठाणेदार, भातकुली