फोटो तसरेंकडे
अमरावती : ग्रामसचिवाला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी पातूर तालुक्यातील ३५ वर्षीय तरुण विभागीय आयुक्तालयाच्या जुन्या इमारतीमधील टॉवरवर चढला. तेथे त्याने अंगावर पेट्रोलदेखील घेतले. अग्निशमन दलाच्या पथकाने त्याच्यावर पाण्याचा मारा केला, तर त्याच वेळी गाडगेनगर पोलिसांनी टॉवरवर चढून त्याला ताब्यात घेतले. विजय बळीराम ताले (३५, रा. सायवणी, पो. चान्नी, ता. पातूर, जि. अकोला) असे या युवकाचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सावरगाव येथील ग्रामसेवक पी.पी.चव्हाण यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी आलेल्या १५ लाख रुपये निधीचा अपहार केला. सबब, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन ताले याने २३ जुलै रोजी विभागीय आयुक्तांना दिले होते. मात्र, तीन दिवस उलटल्यानंतरही कारवाई न झाल्याने ताले सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास विभागीय आयुक्तालयात पोहोचला. एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन तो टॉवरवर चढला. त्याने वरून घोषणाबाजी केली. तातडीने गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर पाण्याचा मारा केल्याने तो ओला झाला. तेवढ्यात त्याला पकडण्यात आले.