बडनेरा : रस्त्याच्या कडेला आजारी अवस्थेत सापडलेल्या आजीला बडनेरा शहरी बेघर निवारा केंद्रात आश्रय मिळाला. आजीचा पत्ता मिळाल्याने तब्बल एक वर्षानंतर कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले केंद्रातून जाताना आजीबाईचे डोळे पाणावले होते.
मागील वर्षीच्या जुलै महिन्यात अमरावतीच्या बेलपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला पार्वताबाई नामक म्हातारी आजारी अवस्थेत आढळून आली. अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय उपजीविका अभियानअंतर्गत बडनेरातील आधार शहरी बेघर केंद्रात आजीला निवारा देण्यात आला. केंद्रामध्ये आजीची संपूर्ण काळजी घेण्यात आली. केंद्रातील कर्मचारी इतर लोकांशी आजीचे ऋणानुबंध तयार झाले. निवारा केंद्राचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसात आजीला तिचा पत्ता विचारला असता तिने अचलपूर मिल कॉलनीचे नाव सांगितल्यानंतर मनपाचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या पुढाकाराने भूषण काळे, अजय मोरस्कर, राजू बसवनाथे यांनी आजीला तिच्या मुलापर्यंत पोहोचवण्यात यश मिळविले. आजीचा शहरी बेघर केंद्राशी जिव्हाळ्याचा ऋणानुबंध तयार झाला होता. आजीला तिच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात आले तेव्हा आजीसह सर्वांचेच डोळे पाणावले होते.