पोलीस विभागात खळबळ : विशाखा समितीकडे चौकशीअमरावती : सुटी मंजूर करण्याकरिता गेलेल्या महिला पोलीस शिपायाला सहायक पोलीस आयुक्तांनी शारीरिक सुखाची मागणी केली. अशी तक्रार पोलीस आयुक्तालयातील विशाखा समितीला प्राप्त झाली आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असणारी महिला काही दिवसांपासून क्रीडा स्पर्धेकरिता बाहेरगावी गेली होती. तेथून परत आल्यावर त्या सहायक पोलीस आयुक्त वा.घ. सूर्यवंशी यांच्याकडे सुटी मंजूर करण्याकरिता गेल्या. दरम्यान सूर्यवंशींनी तिला शारीरिक सुखाची मागणी केली, असा आरोप त्या महिला शिपायांनी केला आहे. यासंदर्भात तक्रार करण्याकरिता त्या महिला पोलीस गाडगेनगर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात (विशाखा समिती) तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची चौकशी विशाखा समितीच्या अध्यक्ष मोनिका राऊत व समितीच्या सदस्या करीत आहेत. पोलीस आयुक्तालयात ही तिसरी घटनाशहर पोलीस आयुक्तालयातील विशाखा समितीकडे महिला लैंगिक छळाच्या आतापर्यंत दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गुरुवारी पुन्हा एका महिला पोलिसाने अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पोलीस आयुक्तालयातच महिलांविषयी गंभीर प्रकार घडत आहेत, हे विशेष. क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी गेलेल्या त्या महिला पोलीस आठ दिवसांपासून सेवेवर हजर नव्हत्या. त्यातच सुट्या मंजूर करुन घेण्यासाठी त्यांनी अनेकदा तकादा लावला. त्यानंतरही तीन दिवस पुन्हा गैरहजर राहिली. तसेच रोल कॉलमध्ये उपस्थित न राहता आरपीआयसोबतच हुज्जतबाजी घालून तक्रार करण्याची धमकीसुध्दा दिली होती. ही बाब रेकार्डवरही आहे. त्या महिलेचा स्वभावच विचित्र आहे. त्यामुळे त्या असा आरोप करीत आहेत. - वा.घ.सूर्यवंशी,सहायक पोलीस आयुक्त प्रशासन. पोलीस अधिकाऱ्याने महिला पोलिसाकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार विशाखा समितीकडे प्राप्त झाली आहे. याप्रकरणाची चौकशी दोन ते तीन दिवसांत पूर्ण करुन पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.- मोनिका राऊत,पोलीस उपायुक्त.
महिला पोलिसाने केली सहायक पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार
By admin | Updated: April 23, 2015 00:04 IST