सुनील वऱ्हाडे : अमरावती बाजार समिती सभापतीपदाचा राजीनामा अमरावती : बदलत्या राजकीय समीकरणात दबावतंत्राचा वापर होत आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर अशा राजकारणात स्वारस्य नाही. सत्ता उपभोगासाठी नसून शेतकरी हितासाठी असते. यापुढे संचालक या नात्याने आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष करू, याचसाठी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सुनील वऱ्हाडे यांनी दिली. अमरावती बाजार समिती सभातीपदाच्या १७ महिन्यांच्या कारकिर्दीत शेतकरीहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आपल्याला अभिमान आहे, असेही वऱ्हाडे यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये अवघ्या पाच रुपयांमध्ये शेतकऱ्यांना जेवणाची सोय करून दिली. मागील ५० वर्षांत बाजार समितीमधील अतिक्रमण काढण्यात आले नव्हते ते काढले. आजवर बाजार समितीबाहेर होणारा कापसाचा व्यापार मार्केट यार्डात आणला. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती वऱ्हाडे यांनी दिली. सभापतीपदी विराजमान होताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युवा स्वाभिमान असे राजकीय समीकरण होते. नंतरच्या काळात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यामध्ये काँग्रेस व शिवसेना एकत्र आलेत. या बदलत्या राजकारणाचा शेतकरीहितावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर कोणी अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. तोडफोडीच्या राजकारणात आपल्याला रस नाही व शेतकऱ्यांसाठी काम करताना दबावतंत्राचा वापर केला जात असेल तर अशा राजकारणात आल्याला स्वारस्य नसल्याचे वऱ्हाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रमोद इंगोले, मिलिंद तायडे, बंडू वानखडे व विनोद गुहे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकरी हिताशिवाय राजकारणात स्वारस्य नाही
By admin | Updated: March 28, 2017 00:01 IST