श्यामकांत पाण्डेय
धारणी : आदिवासी भागात साखळी पद्धतीने सुरू असलेल्या ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेचे काही सदस्य खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील साद्राबाडी ग्रामपंचायतीच्या सचिवांना विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या निधी अफरातफरप्रकरणी जलसंपदा राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी निलंबित केले होते. परंतु, एका विशिष्ट जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याच्या आत त्या ग्रामसेवकाचे निलंबन रद्द करवून घेतले.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्यावर याच प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्या ग्रामसेवकाचे निलंबन रद्द ठरविल्याचे बोलले जाते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक निधी उपलब्ध आहे, त्या ग्रामपंचायतीचा नियमबाह्य पदभार तात्पुरता त्या ग्रामसेवकाकडे सोपविण्यात येत होता. एकदा पैसे काढून झाल्यावर पुन्हा त्या ग्रामसेवकाकडून पदभार काढून घेतला जात होता. मेळघाटातील ग्रामपंचायतींमध्ये होणारा भ्रष्टाचार सामूहिकरीत्या चालत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले असल्यामुळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची चौकशी होणे शक्य होत नाही, असा आजपर्यंतच्या अनुभव आहे.
बॉक्स
पाच-सहा वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून कोट्यावधीचा निधी खर्च केला जात असून, ग्रामपंचायतीने राबविलेली अनेक बांधकामे बेपत्ता आहेत. काही कामांचे अवशेषच दिसून येतात. गैरप्रकारात तरबेज असणाऱ्या त्या ग्रामसेवकाने धारणमहू, शिरपूर, बिजुधावडी, साद्राबाडी अशा ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधीचा अपहार केल्याने बच्चू कडू यांनी त्याला तातडीने निलंबित केले होते. मात्र, मेळघाटातील विशिष्ट जिल्हा परिषद सदस्य वजनदार ठरल्याने राज्यमंत्र्यांच्या आदेशाची अवमानना करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया मेळघाटात व्यक्त होत आहे. मेळघाटातील ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेला भ्रष्टाचार पोखरून काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नवनियुक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पांडा यांच्यावर आली आहे.
----------------------