निकृष्ठ बांधकामाचा आरोप : नागपूर -मुंबईवरुन दबावतंत्रअमरावती : बांधकामाची कंत्राटे मिळवत असतांनाच महापालिकेतील बांधकाम विभागातून बनावट अनुभव प्रमाणपत्र मिळविणाऱ्या खंडेलवालांवर मेहरबानी कुणाची, असा प्रश्न पालिकेत उपस्थित झाला आहे. न्यायालयीन निर्देशानुसार विद्यमान आयुक्तांनी खंडेलवाल भागीदारी संस्थेला काळ्या यादीतून बाहेर काढले खरे तथापि हा निर्णय संपूर्णत: प्रशासकीय असल्याचा दावा कुणाच्याही पचनी पडलेला नाही.तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात जी.एच. खंडेलवाल भागीदारी संस्थेला ब्लॅेकलिस्ट करण्यात आले होते. या संस्थेला ब्लॅेकलिस्ट करणे गुडेवारांना एवढे महागात पडले की त्यांची आयुक्तपदावरुन तात्काळ प्रभावाने बदली करण्यात आली. हे हायप्रोफाइल प्रकरण सेटल करण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. मात्र दबावाला बळी न पडता खंडेलवाल संस्था काळ्या यादीत टाकण्यात आली. त्याचा परिपाक थेट गुडेवारांच्या बदलीमध्ये झाला. खंडेलवालप्रणित संस्थेला काळ्या यादीतून बाहेर काढावे, यासाठी अमरावती ते मुंबई व्हाया नागपुर असे जोरकस प्रयत्न करण्यात आले. मागील अनेक वर्षांमध्ये जी.एच. खंडेलवाल भागीदारी संस्थेने शहरात केलेले अनेक बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन शहर अभियंत्याला हाताशी धरुन खंडेलवाल यांनी अमरावती महापालिकेच्या लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र बनविले. त्या आधारे नागपूुर, चंद्रपूरसह अन्य महापालिकांमध्ये त्यांनी कामे मिळविली. अधिकाऱ्यांशी संगणमत करुन विकासाची वाट लावण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. बनावट अनुभव प्रमाणपत्राने खंडेलवाल प्रकरणाची पोल खोल झाली. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्याबाबत तत्कालीन शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम आणि खंडेलवाल संस्थेविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली.अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र चंद्रपुर, नागपुर महापालिकेत वापरल्या गेले. बनावट अनुभव प्रमाणपत्राचा मुद्दा अधांतरी महापालिकेकडून जी.एच. खंडेलवाल भागीदारी संस्थेला क्लीनचीट देण्यात आली. अन्य महापालिकांमध्ये त्यांनी अमरावती महापालिकेच्या बनावट अनुभव प्रमाणपत्राचा वापर केला. ते बनावट अनुभव प्रमाणपत्र दिले कोणी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या बाबत तत्कालीन शहर अभियंत्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी कुठलाही लेखी खुलासा दिला नाही. त्यामुळे खंडेलवाल संस्थेला बनावट अनुभव प्रमाणपत्र दिले कोणी? याबाबत अमरावतीकरांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
खंडेलवालांवर मेहरबान कोण ?
By admin | Updated: October 28, 2016 00:12 IST