अमरावती : भाजपच्या स्थानिक कार्यालयासमोर शिवसैनिकांनी केलेली जाळपोळ व महापालिकेच्या सभागृहात युवा स्वाभिमानने घातलेल्या गोंधळाप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. मात्र, अद्याप दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. ती अटक केव्हा, असा सवाल करत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी माजी ऊर्जामंत्री तथा भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबाबत नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाबाहेरच्या बॅनरची जाळपोळ केली होती. २४ ऑगस्ट रोजी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पराग गुडधे व अन्य शिवसैैनिकांविरूद्ध गुन्हे दाखल केलेत. १७ ऑगस्ट रोजी महापालिका आमसभेदरम्यान युवा स्वाभिमान कार्यकर्ते सभागृूहात शिरले होते. त्याप्रकरणी महापालिका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून सचिन भेंडे, मरोडकर, चिमोटेंसह अन्य काहींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, अद्याप दोन्ही प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, यासाठी बावनकुळे व पाटील यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी माजी मंत्री अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, पक्षनेता तुषार भारतीय, शहराध्यक्ष किरण पातुरकर, नगरसेवक प्रणित सोनी, स्थायी समिती सभापती सचिन रासने यांच्यासह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.