लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामांसंदर्भात ‘माइंड लॉजिक’ एजन्सीच्या देयकांमध्ये गैरप्रकार असल्याबाबत प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या अध्यक्षतेत गठित झालेल्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे थकीत देयकांचे पाऊणेदोन कोटी रुपये मिळावे, यासाठी ‘माइंड लॉजिक’ने प्रशासनाकडे तगादा लावल्याची माहिती आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेची आॅनलाईन कामे सन २०१६ मध्ये बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीला सोपविली होती. मात्र, गत तीन वर्षांत एकदाही या एजन्सीने वेळेवर निकाल जाहीर केलेला नाही.अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि निकालात कायम गोंधळ, घोळ ही बाब कायम होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘माइंड लॉजिक’ला विद्यापीठातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय लागू करताना या एजन्सीने अव्वाच्या सव्या आकारलेल्या देयकांची चौकशी करण्याचा निर्णय सिनेटमध्ये घेण्यात आला. त्यानुसार मराठे समितीने चौकशी सुरू केली आहे. अनेक देयकांमध्ये घोळ असल्याचे या समितीच्या निदर्शनास आले आहेत. प्रकरण थोडे गंभीर असल्यामुळे गत तीन वर्षांत निकाल व परीक्षा याबाबत अदा करण्यात आलेल्या देयकांमध्ये बारकावे शोधले जात आहे. कुलगुरूंकडे अद्यापही चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ‘माइंड लॉजिक’ची थकीत देयके कशी अदा करावी, हा पेच विद्यापीठ प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. असे असले तरी विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’समर्थकांकडून थकीत देयके अदा करण्यासाठी ‘चोरी छुपके’ फायलींचा प्रवास सुरू असल्याची माहिती आहे.‘माइंड लॉजिक’ कंपनीचे परीक्षेच्या कामांबाबत १.३० कोटी रुपयांचे देयके थकीत आहे. मराठे चौकशी समितीचा अहवाल अप्राप्त आहे. त्याशिवाय ही रक्कम देता येणार नाही. तथापि, ३० टक्के रक्कम अदा केली जाणार आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ
‘माइंड लॉजिक’ देयकांचा चौकशी अहवाल केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST
अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि निकालात कायम गोंधळ, घोळ ही बाब कायम होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘माइंड लॉजिक’ला विद्यापीठातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय लागू करताना या एजन्सीने अव्वाच्या सव्या आकारलेल्या देयकांची चौकशी करण्याचा निर्णय सिनेटमध्ये घेण्यात आला.
‘माइंड लॉजिक’ देयकांचा चौकशी अहवाल केव्हा?
ठळक मुद्देफाईलचा ‘चोरी छुपके’ प्रवास : विद्यापीठाकडे पाऊणेदोन कोटी थकीत