मालखेड, आमला, जळका भागात नुकसान
चांदूर रेल्वे : शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पिकांचेही मोठे नुकसान केले. तालुक्यातील अनेक भागांत गहू झोपला. मालखेड, आमला विश्वेश्वर, जळका जगताप या भागांत गव्हासोबत हरभरा या पिकांचे नुकसान झाले. पंचायत समिती सदस्या प्रतिभा डांगे यांनी आमला भागात पाहणी करून नुकसानाचा अंदाज घेतला.
तालुक्यातही १८ मार्च रोजी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. हलक्या स्वरूपाच्या गाराही पडल्याची काही भागात चर्चा आहे. त्यामुळे हाताशी आलेला गहू आणि हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले. आमला, मालखेड, बासलापूर, जळका जगताप यांसह अनेक भागांत गव्हाचे नुकसान झाले आहे. या पावसाने तालुक्यात अंशत: नुकसान झाल्याचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यास शासनाकडे मदत मागता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बॉक्स
शहरातही अकाली पाऊस
चांदूर रेल्वे शहरात व परिसरात रात्री नऊ वाजता वादळी पाऊस बरसला. यामुळे संत्रा पिकाला लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचे शासकीय स्तरावर सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याप्रमाणे भाजीपाला व इतर फळपिकांनाही या वादळी पावसाने जबर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
------------------------