सामान्यांची फसवणूक : चलन कुणाची खासगी जागीर नव्हे !अमरावती : बँकांतून वितरित केल्या जाणाऱ्या कोऱ्या नोटा आणि चकचकीत शिक्के रघुवीरला रोज हमखास पुरविले जातात. सामान्य नागरिकांना जीर्ण नोटा पुरविणाऱ्या बँका रघुवीरला दररोज कोऱ्या करकरीत नोटा पुरवितातच कशा, या मुद्याची बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही गांभीर्याने चौकशी करणे गरजेचे आहे. दर्जादार नाश्त्याचा दावा करून त्यात तडजोड करणारे रघुवीर प्रतिष्ठान सामान्यांना आकर्षित करण्यासाठी नाना फंडे वापर आहेत. रघुवीरच्या कुठल्याही प्रतिष्ठानात जा, ग्राहकांना पैसे परत देताना नोटा कोऱ्या करकरीतच असतात. रघुवीरच्या काऊंटरवरून दिले जाणारे शिक्केही नवेकोरे असतात. सवाल असा उपस्थित होतो की, अमरावतीकरांना बँका जुन्या, फाटक्या, सेलोटेप आणि पावडर लावलेल्या नोटा देत असताना, एकट्या रघुवीर प्रतिष्ठानलाच दररोज दहा रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंतच्या कोऱ्या करकरीत नोटा देतात कशा? एक, दोन, पाच आणि दहा रुपयांचे नवेकोरे 'क्वॉईन्स'देखील रघुवीरलाच कसे काय पुरविले जातात? चलन हे कुणाची खासगी जागीर नव्हे. चलन सर्वांचेच आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने पाठविलेला सर्वसामान्यांसाठीच्या कोऱ्या चलनाचा साठा एकत्र करून तो हेतुपुरस्सररीत्या रघुवीरला पुरविला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा हिस्सा असलेल्या ठरावीक बँकांचा, त्यातील अधिकाऱ्यांचा यात अर्थात्च सहभाग आहे. हा फौजदारी गुन्हा ठरतो. हा गुन्हा अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. मुद्दा गंभीर आहे. सामान्यांसाठीचे कोरे चलन हिरावून, कारस्थान रचून ते स्वत:च्या व्यावसायिक वापरासाठी वापरण्याच्या सबबीखाली रघुवीरविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती द्यायला हवे. ज्या बँकर्सनी याकामी त्यांना मदत केली त्यांच्याविरुद्धही पोलीस कारवाई नियमानुसार व्हायला हवी. व्यावसायिक लाभासाठी देशाचे चलनही कुणी दावणीला बांधतात अन् सामाजिक संस्थांसकट सर्वच हे मुकाट्याने सहन करतात.
कोऱ्या नोटा रघुवीरकडेच कशा ? कलेक्टर देणार का फौजदारीचे आदेश?
By admin | Updated: October 8, 2016 00:09 IST