सुरेश सवळे - चांदूरबाजारपावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्र सुरू ठेवते. यंदा मृग नक्षत्राच्या हत्ती या वाहनापासून ‘स्वाती’चा ‘घोडा’ या वाहनापर्यंत किमान पाऊस असल्याचा अंदाज यापूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाल्यानंतरही पावसाने जोर धरला नाही. मृग नक्षत्राच्या हत्तीने यावर्षी पाठ फिरविल्याने १५ दिवसात केवळ ३६.६६ मी.मी. पाऊस झाल्याने शेतकरी पार भांबावून गेला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्राचा मोर तारेल आणि पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या दोन दिवसात कोरडेच पडल्याने शेतकऱ्यांची पेरणी पार रखडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २२२ मी.मी. पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत २४८ मी.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र ३६.६६ मी.मी. वरच समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत तालुक्यात कापूस ५७४२ हेक्टर, सोयाबीन ८२७४ हेक्टर, तूर २७४१ हेक्टर, ज्वारी १४६ हेक्टर, मूग ५० हेक्टर, उडीद ३५ हेक्टर असे एकूण १६ हजार ९६८ हेक्टर जमिनीत खरिपाची पेरणी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ९५ हेक्टर कपाशीची पेरणी झाली आहे.८ जूनला मृग नक्षत्र लागले. या नक्षत्रात सहसा पावसाचे आगमन सुनिश्चित समजल्या जाते. गत वर्षी मान्सून १० जूनलाच विदर्भात धडकला होता. हा पाऊस अनेक दिवस सक्रिय राहिल्याने जून महिन्यात तब्बल २४८ मी.मी. पाऊस बरसला. यावेळी २४ जूनपर्यंत केवळ ३६.६६ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने दांडी मारल्याने बळीराजाला सर्वाधिक चिंता लागली आहे. आणखी उशीर झाल्यास खरीप पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मृगाच्या हत्तीने सोंड फिरविल्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या शेतकऱ्यांची आर्द्रा या नक्षत्रावर लक्ष लागून आहे. हे नक्षत्र दमदार पावसाचे मानले जाते. याचे वाहन मोर असल्याने थांबून-थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिले चरण सध्या तरी कोरडे दिसत आहे. तरीही दुसऱ्या चरणात अर्थात २६ ते ३० जून दरम्यान चांगल्या पावसाचे योग आहेत असे महाराष्ट्रीय पंचांगात नमूद आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानुसार मान्सूनने विदर्भात धडक दिली असली तरी नैर्ऋत्येकडून येणाऱ्या मोसमी पावसाच्या वाऱ्याचा जोर कमी आहे.
मृगाच्या हत्तीने फिरविली पाठ आर्द्राचा मोर तारेल काय?
By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST