चौकशी अपूर्णच : जिल्हाधिकाऱ्यांचे संपेना दोन दिवस !इंदल चव्हाण - अमरावतीजिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत खरे; तथापि दोन दिवसांत पूर्ण होणारी चौकशी सव्वा महिना उलटूनही अपूर्णच राहिली. पे्ररणादायी राहणीमान जपणाऱ्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या कार्यप्रणालीची रीत बघून 'क्या हुआ तेरा वादा' या ओळी अलगत आठवतात.जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ नोव्हेंबर रोजी अचलपूर येथील राणी बन्सी राऊत (२०) यांचे बाळ पलंगावरून पडल्याने दगावले होते. याबाबत 'लोकमत'ने सत्य उघड केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. २५ नोव्हेंबरपर्यंत चौकशी अहवाल येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी 'लोकमत'ला सांगितले होते. तथापि २५ ला अहवाल आला नाही. त्यानंतर २८ नोव्हेंबरपर्यंतही चौकशी पूर्ण झालेली नव्हती. त्यानंतर पुन्हा १९ दिवसांनी अर्थात् १७ डिसेंबर रोजी चौकशी अपूर्णच असल्याची आठवण जिल्हाधिकाऱ्यांना करून दिली असता दोन दिवसांत अहवाल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली असता अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतिमान प्रशासनाचा संकल्प सोडणाऱ्या नव्या शासनातील जिल्हाधिकाऱ्यांची ही कार्यपद्धती लोकाभिमुख ठरेल काय?
'क्या हुआ तेरा वादा?'
By admin | Updated: December 20, 2014 22:32 IST