अकोला : जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपत आला असला तरी पाऊस आला नसल्यामुळे राज्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील विविध विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून, राज्यातील ३४२१ गावांमध्ये ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला असला तरी जल साठवणुकीचे नसलेले नियोजन व पाण्याचा अर्मयाद वापर, यामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. राज्यातील ३४२१ गावांमध्ये तसेच ९२0२ वाड्यांमध्ये सध्या ४३३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक १५६२ गावांमध्ये १९५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर विभागात सर्वात कमी ३४ गावांमध्ये २७ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी विदर्भात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही तर गतवर्षीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षी अर्धा पावसाळा संपत आला तरी पावसाचा थेंबही पडला नसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यापाठोपाठ पुणे विभागातही पाणीटंचाईचे संकट जाणवत आहे. या विभागात १0१६ गावांमध्ये १३९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ६५२ गावांमध्ये ७६७ टँकर, अमरावती विभागात १५७ गावांमध्ये १९३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अमरावती विभागात १५७ गावात पाणीटंचाई
By admin | Updated: July 7, 2014 00:49 IST