धारणी : तालुक्यातील पानखाल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंबाडी गावातील पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद पडला आहे. शासकीय पाणीपुरवठा योजनेचा मोटार पंप जळाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. ग्रामसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे गावकऱ्यांना हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जवळपास २०० घरांची वस्ती असलेल्या अंबाडी गावात शासकीय पाणीपुरवठा योजना आहे. ही योजना ग्रामपंचायतमार्फत चालविली जाते. मात्र, या योजनेचा मोटर पंप जळाल्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वेळा ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. मात्र, ते ‘नॉट रिचेबल’ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना कधी सुरू होणार, असा प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहे. तहसीलदार तथा गटविकास अधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली आहे.