अमरावती : ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग शहरात होऊ नये म्हणून त्रिसूत्रीचे पालन होत आहे काय, हे पाहण्याकरिता महापालिका क्षेत्रात सोमवारपासून तीन दिवस चौकाचौकांत चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील २० पथकांचा ‘वॉच‘ राहणार आहे. यात प्रत्येक पथकात महापालिका व पोलीस विभागाचा प्रत्येकी एक कर्मचारी राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी जारी केले.
यामध्ये उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजित भोसले यांच्या नेतृत्वातील पाच पथकांद्वारा कोर्ट परिसर, गाडगेबाबा मंदिर, भाजी बाजार, मोची गल्ली, कॉटन मार्केट रोड, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्या नेतृत्वातील पाच पथकांकडे दस्तूरनगर, रुक्मिणीनगर, इतवारा बाजार, जवाहर गेट, सराफा बाजार, गुलशन मार्केट, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या नेतृत्वातील पाच पथकांकडे जवाहर रोड, रविनगर, गांधी चौक, मालटेकडी, नवाथेचौक, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पाच पथकांकडे जयस्तंभ, राजकमल, इर्विन चौक, मालटेकडी परिसर व पंचवटी चौक येथे वॉच राहणार आहे.