वरूड : येथील एका नवविवाहित तरुणाचा पारडसिंगालगत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. प्रशिष हरीश्चंद्र उभाळे (३४, गजानन महाराज मंदिर परिसर, वरूड) असे मृताचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला. पत्नीला माहेरी सोडल्यानंतर परतीच्या प्रवासात प्रशिष उभाळे यांच्या कारला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. ९ मे रोजी दुपारी नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा गावालगत हा अपघात घडला.
काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर रविवारी सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणात वरूड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्त उपविभागीय अभियंता हरिश्चंद्र उभाळे यांचा प्रशिष हा एकुलता एक मुलगा होता.