पान २ ची लीड : ७ कॉलम फ्लायर (देशमुख साहेबांच्या आदेशानुसार)
फोटो पी १४ श्रेणीक लोढा
वरुड : ‘लोढांना लोळवून टाका, ट्रकच्या समोरच्या चाकात घेऊन चिरडून टाका, नाही तर मांडवली झाली असे म्हणावे लागेल’ असा धमकीचा संवाद असणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दोन रेती तस्करांनी मोबाईलवर साधलेला हा संवाद पोलिसांनी गांभीर्याने घेतला असून, त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. ट्रकखाली चिरडून टाकण्याचा, संपविण्याचा उल्लेख त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास मिळतो, ते श्रेणिक लोढा दुसरे तिसरे कुणी नसून, वरूडचे ठाणेदार तथा परीविक्षाधिन आयपीएस आहेत. महिनाभरात तब्बल ४२ ट्रक-डंपर जप्त करून त्यांनी वरूड तालुक्यातील रेती तस्करांच्या मुळावर घाव घातला. त्यामुळे त्यांना चिरडून टाकण्याची धमकी व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास मिळते.
परीविक्षाधिन आयपीएस श्रेणिक लोढा यांनी वरूड येथे ठाणेदार म्हणून रुजू होताच अवैध व ओव्हरलोड रेती तस्करीला चाप लावण्यासाठी धाडसत्र राबविले. तब्बल ३५ डंपर जप्त केले. ‘मांडवली’ करण्यासाठी सरसावलेल्या काही रेती तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यानंतर पुन्हा सात डंपर, ट्रक पकडून रेती तस्करांना चाप लावला. यामुळे त्रस्त रेती तस्कर चक्क लोढा यांच्या जिवावर उठले आहेत. त्यांना ट्रकखाली चिरडून जिवे मारण्याची धमकी एका ऑडिओ क्लिपमधून उघडकीस आली. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी काय दखल घेणार, याकडे नागरिकांसह पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेतीची बेसुमार ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. संपूर्ण राज्यासह अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव थांबल्याने रेती तस्करीला ऊत आला आहे. परिवहन आणि खनिकर्म विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अव्याहतपणे रेती तस्करी सुरू आहे. श्रेणिक लोढा हे येथे ठाणेदार म्हणून रुजू होताच त्यांनी अवैध ओव्हरलोड रेती तस्करीला लक्ष्य केले. पोलिसांच्या कारवाईनंतर महसूल विभागाने रेती तस्करांना तब्बल १ कोटी ५ लाख रुपये दंड ठोठावला. मात्र, रेतीतस्कर बधले नाहीत. पुन्हा रेती वाहतूकदारांनी तोंड वर काढून १८ चाकी ट्रेलर आणि १२ चाकी ट्रकद्वारे ओव्हरलोड रेतीची वाहतूक सुरू केली. त्यावरही लोढा यांनी कारवाई केली. त्यामुळे रेती तस्कर कावरेबावरे झाले आहेत. यामुळेच दोन रेती तस्करांच्या मोबाईल संभाषणातून लोढा यांना संपविण्याचा सल्ला वजा धमकी देण्यात आल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.
कोट
मी धमक्यांना घाबरणारा नाही. व्हायरल झालेली, मला जिवे मारण्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप वरिष्ठांना पाठवू. जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकस्तरावर याबाबत तक्रार करू.
श्रेणिक लोढा, ठाणेदार, वरूड
----