गजानन मोहोड - अमरावतीकापूस एकाधिकार पणन महामंडळाला अद्याप मुहूर्त गवसला नाही. १५ नोव्हेंबरला राज्यातील काही प्रमुख केंद्रांवर मुहूर्ताचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खासगी व्यापारी किंवा खासगी जिनिंगला कापूस विक्रीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची नड ओळखून व्यापारीदेखील शासकीय हमी भाव ४ हजार ३६० रुपये असताना तब्बल हजार रुपये कमी भावाने कापूस खरेदी करीत आहेत. कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू नसल्यानेच पांढरे सोने मातीमोल भावात विकले जात आहे. वास्तविकत: सोयाबीन, मूग व उडीद हे १०० दिवसांच्या अल्प कालावधीत घेतले जाणारे पीक ‘कॅशक्रॉप’ म्हणून ओळखले जाते. परंतु यंदा जून महिन्यापासून पावसाने दांडी मारली. यामध्ये मूग व उडीद पेरणीचा कालावधी संपला. निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात ५० ते ७० टक्क्यांनी घट झाली. शेतकऱ्यांचा अर्धाही उत्पादन खर्च निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता कपाशीवर आहे. पूर्वमान्सून व धूळपेरणीचा कापूस एव्हाना शेतकऱ्यांच्या घरी आहे. दोन वेचे आटोपले. तसेच खरिपाच्या कापसाची वेचणी सुरू आहे.
कापूस खरेदी मुहूर्ताची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By admin | Updated: November 8, 2014 22:30 IST