जवळा सेवा सहकारी सोसायटी येथील कारभार
ऑनलाईन मतदानात ८३ मतदान जास्त;
चांदूर बाजार : तालुक्यातील जवळा सेवा सहकारी सोसायटीच्या मंगळवारी झालेल्या जिल्हा बँक प्रतिनिधी निवडीदरम्यान ऑनलाइन मतदानात मोठा घोळ झाला. प्रत्यक्षात ३६२ मतदार असताना ४४५ मतदान झाल्याने या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप सोसायटीच्या मतदारांनी केला आहे.
जिल्हा बँकेवर आपले अधिराज्य गाजवण्यासाठी मोठमोठे राजकारणी आपले प्रतिनिधी म्हणून निवड होण्याकरिता सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवितात. या निवडीकरिता छोट्याशा सेवा सहकारी सोसायटीचे सदस्यामधून बँकेवर प्रतिनिधी पाठवण्याची पद्धत आहे. याची निवड प्रक्रिया सध्या जिल्हाभर सुरू आहे. अनेक वर्षापासून आपलेच अधिराज्य राहावे, याकरिता काही राजकारणी निरनिराळ्या खेळी खेळत असतात. या निवडणुकीदरम्यान साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच पद्धती अवलंबून जागा काबीज करण्याची सहकार क्षेत्रात पद्धत झाली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने जिल्हाधिकारी अमरावती यांनी ही निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घ्यावी. अन्यथा ५० टक्के उपस्थितीत घ्यावी, असे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी जवळा सेवा सहकारी सोसायटी येथे झालेल्या ऑनलाईन निवडणुकीदरम्यान मतदानात मोठा घोळ झाला. मतदानाची प्रक्रिया झूम मिटिंगद्वारे घेण्यात येत असताना सहायक निबंधक कार्यालयातर्फे मतदारांना निवडणुकीची लिंक पाठवण्यात आली होती. या निवडणुकीत ३६२ मतदार असताना ४४५ मतदान झाल्याचे समोर आले. या निवडणुकीदरम्यान ८५ मतदारांनी फेर मतदान अथवा यादीत ज्यांची नावे नाहीत, अशा मतदारांनीसुद्धा मतदान केल्याची शंका जवळा सेवा सहकारी सोसायटीचे सचिव प्रीती चौधरी यांनी व्यक्त केली.
जवळा सेवा सहकारी सोसायटीतून जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी नामांकन दाखल केले होते. त्यांच्या विरोधात मोहन विधळे यांनी नामांकन दाखल केले होते. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ३६२ मतदार असताना ४४५ मतदान झाल्याने या निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप मोहन विधळे यांनी तालुका सहायक निबंधक अधिकारी यांच्याकडे केली आहे. यामुळे या हाय प्रोफाईल गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अंतिम निर्णय काय होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बोगस मतदारांवर तसेच मतदानाची लिंक इतर नागरिकांपर्यंत पोहचली कशी, याच्या चौकशीची मागणी मोहन विधळे यांनी तक्रारीत केली आहे.
जवळा सेवा सहकारी सोसायटीतील काही मतदार हे विदेशात वास्तव्यास आहेत. लिंकच्या अभावामुळे तसेच काही मतदारांकडे मोबाईलचा वापर नसल्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता होती. मात्र, मतदान हे २५ टक्क्यांनी वाढल्यामुळे निश्चितच या मतदानात घोळ झाल्याचे समोर येत आहे.