कारागृहात पालखी दिंडीचे भ्रमण : टाळ, मृदंगाच्या स्वराने परिसर भक्तिमयअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंडी काढण्यात आली. टाळ, मृदंगाच्या स्वराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पाषाणआड भिंतीमागे विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांनी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत जणू झालेल्या चुकांचे प्रायश्चित करण्यासाठी साकडे घातले, असा भक्तिसागर कारागृहात उसळला होता.कारागृहात विविध जाती, धर्म, पंथीय व्यक्ती गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहेत. यात काही न्यायाधीन तर काहींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. परंतु सोमवारी पाखली दिंडी काढण्यात येणार असल्याचे बंदीजनांना कळताच विठुरायाच्या भक्तीने अनेकांचे पाय आपसूकच कार्यक्रमस्थळाकडे वळले. तटाच्या बाजूने ही पालखी दिंडी भ्रमण करीत बंदीजन बराकीतून बाहेर येत विठ्ठलाचे दर्शन घेत होते. अल्ला, देव एक असे म्हणत बंदीजनांनी पालखीचे दर्शन घेतले. दिंडीत ११० पुरुष तर ४० महिला बंदी सहभागी होत्या. कार्यक्रमासाठी उपअधिक्षक बी.एन. ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अे.अे. पिल्लेवान, अतिरिक्त वरिष्ठ तुरुगांधिकारी नितीन क्षीरसागर, ए. आर. गव्हाणे, हवालदार ढाबेराव, अंधारे, मुदगुले, कापरे उपस्थित होते.
विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले बंदीजन
By admin | Updated: July 28, 2015 00:45 IST