से दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा (अमरावती) : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामिनावर बुधवारी सरकारी पक्षाच्यावतीने अचलपूर न्यायालयात से दाखल करण्यात आला. आरोपींच्या वकिलांनी वेळ मागितल्याने आता गुरुवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस.के. मुंगीनवार यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी विनोद शिवकुमार याच्या वकिलाच्यावतीने अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर बुधवारी सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता धनराज नवले यांनी से दाखल केला, तर विनोद शिवकुमार याच्या वकिलाने जामिनावर चर्चेसाठी वेळ मागितला. यामुळे गुरुवारी यावर सुनावणी होणार आहे.
बॉक्स
जामीन की पुन्हा नागपूर?
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात विनोद शिवकुमार व सहआरोपी तथा निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा अंतरिम जामीन अर्ज याच न्यायालयाने फेटाळला होता. विनोद शिवकुमार याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून पुन्हा संबंधित प्रकरणाची चार्जशीट दाखल झाल्यामुळे अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी विनोद शिवकुमार याला जामीन मिळणार की पुन्हा नागपूर न्यायालयात दाद मागावी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.