बाहेरच्या पानासाठी
प्रस्ताव धूळखात : पस्तलई येथील प्रकार
परतवाडा : मेळघाटात एका घराचा, बिनगावाचा पोलीस पाटील २० महिन्यांपासून कार्यरत आहे. या पोलीस पाटलाचे पद निरस्त करण्याकरिता गुगामल वन्यजीव विभागाचे प्रयत्न आहेत. याकरिता वनविभाग व चिखलदरा पोलीस ठाण्याकडून धारणी येथील सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे २० महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय प्रक्रियेत हा प्रस्ताव अजूनही निर्णयाप्रत पोहोचलेला नाही.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंरक्षित क्षेत्रातील पस्तलई गावाचे २०१९ मध्ये अचलपूर तालुक्यातील येवता गावालगत पुनर्वसन करण्यात आले आहे. पस्तलईमधील १७८ कुटुंबांपैकी १७२ कुटुंबांचे येवता व वडगाव फत्तेपूरमध्ये पुनर्वसन झाले. मात्र, पस्तलईचे पोलीस पाटील लालमन धांडेकर व त्याचे बंधू सखाराम धांडेकर आजही पस्तलईमध्येच वास्तव्यास आहेत. गावातील ९९ टक्के लोकांचे पुनर्वसन होऊनही पस्तलईचे पोलीस पाटील पद लालमनकडेच आहे. आज या गावात केवळ लालमनचे एकच घर त्या ठिकाणी असून, गावाचे पुनर्वसन झाल्यामुळे गाव मात्र त्या ठिकाणी नाही. दरम्यान, पस्तलई येथे पोलीस पाटील पदाची आवश्यकता नाही. मौजा येवता (पुनर्वसित) येथे पोलीस पाटील पदाची गरज आहे. त्या पुनर्वसित लोकांमधून पोलीस पाटील पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव गुगामल वन्यजीव विभागाकडून सहायक जिल्हाधिकारी धारणी यांच्याकडे देण्यात आला आहे.
कोट
पोलीस पाटलाच्या अनुषंगाने सहायक जिल्हाधिकारी (धारणी)कडून प्राप्त प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. पुनर्वसित येवता परिसराला महसुली गावाचा दर्जा मिळाल्यानंतरच पोलीस पाटील नियुक्तीची प्रक्रिया होऊ शकेल. पुनर्वसित कुटुंबांकरिता येवता येथील पोलीस पाटील कार्यरत आहेत.
- संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, अचलपूर
कोट
पस्तलई गावचे पुनर्वसन झाले आहे. पोलीस पाटलाचे एक घर केवळ तेथे आहे. त्या घरातील कुटुंबाच्या पुनर्वसनाकरिता ८५ लाखांचा निधी एक वर्षापासून तसाच पडून आहे. पुनर्वसनानंतर पस्तलई परिसरात वन्यजिवांचे वास्तव्य वाढले आहे. वाघ, गवे, सांबर, रानकुत्रे त्या परिसरात दिसत आहेत.
- मयूर भैलुमे, आरएफओ, चिखलदरा.
——————————-