अमरावती : जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा मागील उडत होता. आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तोंडावर आला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गावबंदी करणारे उमेदवार, कार्यकर्ते मतदानासाठी गावाला या म्हणून हात जोडून विनवणी सुरू आहे.
ग्रामीण भागातील लोक पुणा, मुंबई व इतर शहरांत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. कोरोना संकटात हेच कामगार गावाकडे येण्यासाठी धडपडत होते. परंतु अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी लादली गेली. त्यावेळी कामगार चांगलेच त्रस्त झाले होते. गावातील कार्यकर्ते नागरिकांना, कामगारही परका वाटत होता. विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत हाेते. मात्र, आता परगावी गेलेल्या कामगारांची मते आपल्या झोळीत पडावी यासाठी हेच उमेदवार अन कार्यकर्ते आता मनधरणी करताना दिसून येत आहे. म्हणूनच गल्ली ते दिल्ली असे समीकरण असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून मतांचा जोगवा मागण्यासाठी व मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यकर्ते उमेदवारांना पुणे मुंबई व अन्य शहरांत गेलेल्या मतदार राजाला शोधून गावात येण्याची विनवणी करावी लागत आहे. अशा तऱ्हेने ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींच्या आणि विशेषतः मोठ्या गावांत निवडणूक चुरशीची होणार असून, ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच पक्ष व गटाला कशी मिळेल, यासाठी अनेक प्रतिष्ठितांनी कंबर कसली आहे.
बॉक्स
अनेकांनी केलेली वाहनांची व्यवस्था
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाहेर ठिकाणी राहणाऱ्या मतदारांना मतदानासाठी यावे, असे साकडे उमेदवार व त्याचे समर्थक घालीत आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून खास वाहनांची व्यवस्था करून मतदारांना नेणे व आणण्याची जबाबदारीसुद्धा उचलली जात आहे.