लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची संधी मला श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे. नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्याच्या प्रक्रियेत मी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून योगदान देऊ शकलो, याचे विशेष समाधान आहे. ज्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या, त्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन. निष्काम भावनेने हे पद स्वीकारले. त्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. गुरुकुंज मोझरी आश्रमात मध्यवर्ती प्रतिनिधी सभेत आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ग्राम विकासाच्यादृष्टीने मूलभूत विचारांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. इमारतीचे नूतनीकरण तसेच पुनर्बांधणीसाठी निश्चितपणे कालबद्ध कार्यक्रम आखू. महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता, दारूबंदी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत याबाबत अशासकीय विधेयक मांडणार असल्याचे ते म्हणाले. बाबासाहेबांचा सामाजिक न्यायाचा व हनुमानाच्या सेवेचा विचार एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी सिद्ध होऊ, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. सभेच्या अध्यक्षस्थानी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष तथा माजी आमदार पुष्पा बोंडे उपस्थित होत्या. यावेळी प्रास्ताविक वाघ यांनी केले. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे...’ ही सामूहिक प्रार्थना झाली. संचालन जनार्दनपंत बोथे यांनी केले.