अमरावती : आध्यात्मिक वैभव असलेल्या एकवीरा देवीच्या मूर्तीवरील शेंदराची खोळ बुधवारी आपसूक निघाल्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन होऊ शकले. काळ्या पाषाणाची ही मूर्ती चतुर्भुजाधारी आणि आसनस्थ आहे. या घटनेनंतर मंदिर व्यवस्थापन आणि भक्त गदगद झाले आहेत. सुमारे ६०० ते ७०० वर्षांपासून या मूर्तीवर शेंदराचा लेप सातत्याने लावण्यात येत होता. या काळात मूळ मूर्तीचे दर्शन घेतल्याची नोंद कुठेही उपलब्ध नाही. सहा ते सात शतकांनंतर मूळ मूर्तीचे दर्शन होऊ शकल्यामुळे मंदिर व्यवस्थापनात कमालीचा उत्साह संचारला आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मंदिर समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भोंदू हे गाभाऱ्यात गेले असताना त्यांना मूर्तीवरील शेंदराची खोळ खाली पडलेली दिसली. त्यानंतर लगेच व्यवस्थापनाने मंदिराचा गाभारा कापडाने झाकला. या महत्त्वपूर्ण घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ९ च्या सुमारास मंदिराला भेट दिली. राजशिष्टाचारानुसार आवश्यक तो पोलीसताफा यावेळी मंदिरात तैनात होता.मूर्तीवर होणार अभिषेकजिल्हाधिकाऱ्यांनी गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचे दर्शन घेतले. निरीक्षण केले. मंदिर व्यवस्थापनाशी त्यांनी चर्चा केली. बंद करण्यात आलेला गाभारा ३१ च्या सायंकाळी दर्शनासाठी खुला केला जाईल. खोळ निघाल्यामुळे मूर्तीवर आवश्यक ते विधीवत उपचार आणि अभिषेक केला जाईल, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रमेशपंत गोडबोले यांनी दिली. भक्तांनी संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. हल्ली एकवीरा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. असा आहे इतिहास : शेकडो वर्षांपूर्वी जनार्दन स्वामींनी एकवीरा देवीची स्थापना केल्याचे सांगण्यात येते. एकवीरा ही अंबादेवीची थोरली बहीण होय. दोघींचीही मंदिरे आजुबाजुला आहेत.
एकवीरा देवीच्या मूळ चतुर्भूज मूर्तीचे दर्शन
By admin | Updated: August 27, 2014 23:10 IST