अमरावती : मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक विभागाने अमरावतीमधील जिल्हा स्त्रि रुग्णालयात कौशल्य प्रयोगशाळा सुरु केली. विदर्भातील पहिली तर महाराष्ट्रात दुसरी अशी हि स्किल लॅब अमरावतीत आकारास आली आहे. स्किल लॅब सुरु झाल्यापासून मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. गरोदरपणात तसेच प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर प्रशिक्षित मनुष्यबळाच्या सहाय्याने नक्की मात करता येईल या दृष्टीकोनातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुसज्ज अशी स्किल लॅब सुरु करण्यात आली. माता, नवजात बालके तसेच किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्य सेवांसबंधी कौशल्यामध्ये व कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे हा या स्किल लॅबचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील १३४० चौरस फुटांमध्ये विविध उपकरणे व औषधांनी ही स्किल लॅब सज्ज आहे. डिसेंबर २०१४ मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात स्किल लॅब सुरु करण्यात आली. स्किल लॅबमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून रुग्णालयात होणाऱ्या बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते. सन २०१४ च्या जानेवारी व फेब्रुवारीमध्ये एकूण 64 बालमृत्यू झाले. परंतु सन २०१५ च्या जानेवारी व फेब्रुवारीमध्ये केवळ 16 बालमृत्यूची नोंद आहे. म्हणजेच बालमृत्यूचे प्रमाण ६४ वरुन १६ वर आले आहे. सन २०१४ च्या जानेवारी व फेब्रुवारीत ३ मातामृत्यू झाले, तर सन २०१५ च्या सुरुवातीपासून फेब्रुवारीअखेरपर्यंत एक मातामृत्यू झाला आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागातील रुग्ण डफरीनमध्ये दाखल करण्यात येतात.त्यांच्यावर योग्य उपचार होत आहे. (प्रतिनिधी)
विदर्भातील पहिली ‘स्किल लॅब’ अमरावतीत
By admin | Updated: April 1, 2015 00:24 IST