झुबेन बरूचा : आयपीएलमुळे मिळाली गुणवंतांना संधी संदीप मानकर अमरावती इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मुळे क्रिके्रट जगतात अनेक नवोदित खेळांडूना खऱ्या अर्थाने मोठे होण्याची संधी मिळाली. अलीकडे आयपीएलमध्ये येत असलेल्या विदर्भातील खेळाडुंमध्ये मोठी क्षमता आहे. खेळाडुंनी प्रामाणिक परिश्रम केल्यास ते क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकतात, असे मत खास ‘लोकमत’शी बोलताना माजी रणजीपटू तथा ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ संघाचे डायरेक्टर झुबेन बरूचा यांनी व्यक्त केले.अंबानगरीत एका कार्यक्रमानिमित्त आलेअसता त्यांनी लोकमतशी संवाद साधला. झुबेन बरूचा हे सन १९९२ ते ९५ पर्यंत रणजी करंडक सामने खेळले होते. या दरम्यान त्यांनी चार शतके, पाच अर्धशतके व संपूर्ण रणजी करिअरमध्ये एक हजार धावा केल्या होत्या. मूळ मुंबई येथील रहिवासी असलेले झुबेन यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई विद्यापीठातच झाल. त्यानंतर त्यांनी लंडनमधून एमबीएची पदवी घेतली. त्यांचे वडिल उद्योजक तर आई शिक्षिका आहेत.झुबेन म्हणाले, त्यांना विद्यार्थी जीवनापासूनच क्रिकेटची आवड होती. पण, क्रिकेटबरोबर शिक्षणालाही तेवढेच महत्त्व दिले. वयाच्या १३ व्या वर्षी मुंबई क्रिक्रेट असोसिएशनमध्ये ते दाखल झाले. भारतरत्न सचिव तेंडूलकरपेक्षा मी वयाने जरी मोठा असलो तरी त्या काळात त्यांच्यासोबत रणजी ट्रॉफी व इरानी ट्रॉफी खेळण्याचे भाग्य लाभले, असे ते आवर्जुन सांगतात. या दोन्ही ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात त्यांनी दोन शतके ठोकली. सचिन तेंडुुलकर ‘जीनिअस’ खेळाडू असल्याचा ते गर्वाने उल्लेख करतात. झुबेन यांच्या पाठीशी अनेक अनुभव आहेत. ते सांगतात, सन १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला व तेथूनच क्रिकेटचे वेड लागले. सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, विनोद कांबळी यांच्या कॅप्टनशीपमध्ये अनेक रणजी इंटरनॅशनल मॅचेस खेळलो. सुनील गावसकर क्रिकेटमधील प्रेरणास्थान असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. महाविद्यालयातील क्रिकेट कोच व्ही.एस.पाटील, मुंबई असोसिएशनमध्ये वसंत अमलादी व रणजीचे हनुमंत सिंग यांच्याकडून त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले आहेत. क्रिकेट खेळत असतानाच तळागळातील गुणवान खेळाडूंसाठी काहीतरी करावे, हे डोक्यात घेतले. त्यामुळे आयपीएल येण्यापूर्वी ‘क्रिकेट स्टार्ट’ हा टीव्ही शो केला. सन २००८ मध्ये आयपीएलमध्ये ‘राजस्थान रॉयल’चे ओनर मनोज बदाले यांच्या सोबत काम सुरु केले. अनेक वर्ष डायरेक्टर म्हणून यशस्वी काम केले. विदर्भातील टॅलेंट ओळखून अमित पौनीकर, श्रीकांत वाघ, फैज फजल या विदर्भातील नवोदित खेळाडुंना राजस्थान रॉयलमध्ये संधी दिली. उमेश यादवसारखे खेळाडू विदर्भातून तयार झाल्याचा मला आनंद आहे, असे ते म्हणतात. राहुल द्रविड हे एक उत्तम प्रशिक्षक असून ते उत्तम धुरा सांभाळत असल्याचा गौरवोल्लेखही त्यांनी केला.
विदर्भातील क्रिकेटपटुंमध्ये मोठी क्षमता
By admin | Updated: May 25, 2016 00:34 IST