शेतकऱ्यांच्या बांधावर आता पशुवैद्यकीय दवाखाने
अत्याधुनिक सोयींयुक्त पशुसेवा, जनावरांना मिळणार जागेवर उपचार
अमरावती : जनावरे, आजारी पडल्यानंतर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. काहीवेळा पशुपालकांना जनावराला स्वखर्चाने पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत घेऊन जावे लागत होते. पशुधनालाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेवर उपचार मिळावेत यासाठी पशुसंवर्धन विभागात फिरते मोबाईल दवाखान्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.
पशुधनाची आवश्यक काळजी, तसेच विविध आजारांवरील नियंत्रणासाठी उपचारांसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला आमदार बळवंत वानखडे, महापौर चेतन गावंडे, झेडपी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सदस्य शरद मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेत सुरू झालेल्या या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित आहे. पशुवैद्यकीय अधिका-यांसह इतर आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध आहे. पशुधनाची निगा राखणे व विविध पशुआजारांच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बॉक्स
टोल फ्रि क्रमांकावर सेवा
फिरत्या दवाखान्याच्या सेवेसाठी शेतकरी बांधवांना संपर्क साधता यावा म्हणून पशुसंवर्धन कार्यालयाकडून स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून,१९६२ हा टोल फ्री क्रमांक येत्या सोमवारपासून कार्यान्वित केला जाणार आहे. या माध्यमातून सेवेबाबत मागणी प्राप्त होताच कक्षातून थेट फिरत्या दवाखान्याला संदेश प्राप्त होईल व पुढील कार्यवाहीसाठी व्हॅन तत्काळ रवाना होईल, अशी माहिती डॉ. गोहोत्रे व डॉ. रहाटे यांनी दिली.पहिल्या टप्प्यात तिवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी व अमरावती तालुक्यात ही व्हॅन फिरेल.