खोदकाम : खड्डा बुजविला, गतिरोधक तयार अमरावती : स्थानिक दसरा मैदानासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केलेल्या खोदकामानंतर रस्ता उखडला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा व्यवस्थितरीत्या बुजवला, त्यावर डांबरीकरण केले. मात्र, आता या खड्ड्याला गतिरोधकाचे स्वरूप आले आहे. परिणामी आतापर्यंत खड्ड्याच्या अडचणीमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना आता खड्ड्याला आलेल्या गतिरोधकाच्या स्वरूपामुळे उंचवट्याचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने काही दिवसांपूर्वी जुनी पाईपलाइन बदलविण्यासाठी दसरा मैदानासमोरील रस्त्यावर खोदकाम केले होते. काम झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डा व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्ता उखडला होता. त्यामुळे येथून ये-जा करणारी वाहने घसरत होती. अनेक वाहनधारकांना किरकोळ अपघातही झालेत. मात्र, तरीही या रस्त्याची दुरूस्ती करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन ते तीन दिवस लावले. दरम्यान, प्रहारचे जिल्हा संघटक रोशन देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजापेठ पोलिसांकडे केली. त्यानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्त केला. खोदकाम केलेली जागा व्यवस्थित बुजवून त्यावर डांबरीकरण केले. त्यामुळे खड्डा तर बुजला. मात्र, उंचवटा तयार झाल्याने आपसुकच गतिरोधक तयार झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना आता गतिरोधकाचे धक्के सोसावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ उंचवट्यामुळे वाहनधारक हैराण
By admin | Updated: December 19, 2015 00:15 IST