फोटो - वरूड ०७ एस
वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी 'ब्रेक द चेन' असे आवाहन करीत ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना, बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले. परंतु, वरूडवासीयांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली. मंगळवारी व बुधवारीदेखील बाजारातील काही दुकाने सुरूच होती.
वरूड शहरासह तालुक्यात दिवसागणिक ३० ते ४० रुग्णसंख्या निघत आहे.
नागरिकांना वेळोवेळी सांगितलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी रात्री ८ पासून सकाळी ७ पर्यंत संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी आदेश जारी केले आहे. यामधे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने, दुकाने, खासगी कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र वरूडमधे सकाळी आठ वाजता नगरपरिषद आणि पोलिसांचे वाहन सायरन वाजवून निघून गेले. सर्व दुकाने सर्रास सुरू असून, नेहमीसारखी गर्दी बुधवारीदेखील कायम होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वरूडवासीयांनी केराची टोपली दाखविली आहे.