गावात अद्यापही शोककळा : ‘त्या’ तलावातील गाळ उपसणार, यापूर्वीही गेला तरूणाचा बळी धामणगाव रेल्वे : बाप-लेकाचा बळी घेणाऱ्या दाभाडा येथील ‘त्या ’ साठवण तलावाची मागील चार वर्षांत साफसफाई झाली नाही, तसेच गाळही काढला न गेल्याची वस्तुस्थिती पाहणीनंतर पुढे आली आहे. मात्र, यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच तलावातील गाळ काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून शासनाद्वारा मृतांच्या वारसाला आर्थिक मदतही देण्यात येणार आहे. शेतात बकऱ्या चारण्यास गेलेल्या पिता-पुत्राचा साठवण तलावात पडून गाळात अडकून रविवारी मृत्यू झाला होता. याघटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान मृत सुधाकर ठोकळे व दर्शन ठोकळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आ. वीरेंद्र जगताप यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले होते. मंगळवारी माजी आमदार अरूण अडसड यांनी देखील मंगळवारी ज्या तलावात बूडून बापलेकांचा मृत्यू झाला त्या तलावाची प्रशासकीय अधिकाऱ्यांसमक्ष पाहणी केली़ हा साठवण तलाव अप्पर वर्धा विभागाने रोजगार हमी योजनेंतर्गत सन १९९० मध्ये तयार केला होता़ त्यानंतर सन २०१२ मध्ये जि़प़च्या लघुसिंचन विभागाने तो तलाव ताब्यात घेऊन ७८ लाख रूपयांच्या निधीतून या तलावाची दुरूस्ती केली होती़ मात्र, तलावाचे मुख्य काम करण्याऐवजी केवळ डागडुजी केली गेली. पण, यावेळीही गाळ काढला गेला नव्हता, हे मंगळवारच्या पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. (तालुका प्रतिनिधी) -तर उपोषणाला बसणार- वीरेंद्र जगताप बाप-लेकांच्या मृत्यूसाठी साठवण तलाव कारणीभूत ठरला. त्यामुळे जलसंधारण विभागाद्वारे मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे़ अनेक दिवसांपासून तलावातील गाळच काढला नसल्याने हा तलाव धोकादायत झाला आहे़ त्यामुळे शासनाने आठवडाभरात ठोकळे कुटुंबाला आर्थिक मदत न दिल्यास उपोेषण करण्याचा इशारा आ़वीरेंद्र जगताप यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रातून दिला आहे़ अखेर ‘त्या’तलावातील गाळ काढणार यातलावातील गाळ व दुरूस्तीसाठी निधी प्राप्त असताना देखील तीन वर्षांपूर्वी यात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे़ आता जलयुक्त शिवार अभियानांर्तगत तलावातील गाळ काढून दुरूस्ती करण्यात येणार आहे़ यासंदर्भात लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता के.एस़पाटील,शाखा अभियंता एस़एस़निमजे यांनी तलावाची पाहणी केली़ यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करून प्रशासनाला सादर केले जाईल. भाजप नेते अरूण अडसड यांनी देखील मंगळवारी मृत सुधाकरची पत्नी वंदनाबार्इंची भेट घेऊन सांत्वन केले. दाभाड्यात ‘लोकमत’चीच चर्चा ‘नववर्षात उद्ध्वस्त झाले वंदनाबार्इंचे जग’ या मथळ्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करून त्यांच्या वेदना मांडल्या होत्या. या वृत्ताची दाभाड्यात मंगळवारी दिवसभर चर्चा होती. वंदनाबार्इंना त्वरित आर्थिक मदत मिळावी, असा गावकऱ्यांचाही सूर होता.
वंदनातार्इंना मिळणार राज्य शासनाची मदत
By admin | Updated: January 4, 2017 00:17 IST