बडनेरा : येथील मोदी दवाखान्यात आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर जेमतेम लस उपलब्ध झाली. त्यामुळे पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या. मात्र, तेथील मोजका लसींचा पुरवठा, अधिकाऱ्यांमधील असमन्वय, नियोजनाच्या अभावामुळे केंद्रावर सावळागोंधळ पहावयास मिळाला.
लस मिळणार म्हणून गुरुवारी पहाटे पाच वाजतापासूनच मोदी दवाखान्यात नागरिकांनी रांगा लावल्या. उन्हाचे चटके सहन करीत रांगेत उभे असताना सहा तासांनंतर टोकन देण्यात आले. या केंद्रावर सकाळी १०.३० वाजतापर्यंत अधिकाऱ्यांचा थांगपत्ताच नसल्याने नागरिकांचा संताप उडाला. दीडशे टोकन वाटण्यात आले. त्यामुळे दूरदुरून आलेले ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग निराशेने परत गेले. हे सर्व नागरिक तीन दिवसांपासून लसीकरणासाठी केंद्रावर चकरा मारत होते. काही नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला याचा जाब विचारला व लस घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर ५० लोकांना टोकन देण्यात आले. मात्र, गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन लगतच्या ट्रामा केअर येथे लसीकरण सुरू करावे. येथे बसण्याची सोय अशल्याने नागरिकांची आग्रही मागणी आहे.
बॉक्स
वैद्यकीय अधिकारी नेहमीच उशिरा
या केंद्रावर नागरिकांसाठी सुविधाच नसल्याने नागरिकांना त्रास न होता लसीकरण सुरळीत पार पडेल याची जबाबदारी नगरसेवकांनी घ्यावी, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. लसीकरण केंद्राला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती पहावयास मिळाली. केंद्रात लसीचा साठा उपलब्ध असताना लसीकरणातील अधिकारी-कर्मचारी व पोलीस उशिरा पोहोचल्यानेच गोंधळ झाल्याचे दिसून आले.