लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : पावसाची उसंत असल्याने रविवारी नागरिक व्यस्त असताना सकाळी १०.२३ वाजता अचानक जमिनीतून मोठा धक्का बसला, काय होते हे समजण्यापूर्वीच १०.२५ ला दुसरा मोठा धक्का बसला, घरातील भांडी पडली, त्यामुळे नागरिक घाबरले व घराबाहेर पडल्याचा प्रकार तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे घडला. गतवर्षी कोजागिरीला देखील असेच धक्के जाणवले होते.
आवाजासह धक्क्यांमुळे गावात कोणतेही नुकसान नाही, अथवा घरांना भेगा पडल्या नाहीत. याबाबत तहसीलदार, तिवसा यांनी तत्काळ माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी अकोला व अन्य ठिकाणांवरील 'सिस्मोग्रॉफ' यंत्रावर काही नोंद झाली काय, याची माहिती घेतली घेतली असता कुठेही भूकंपाची नोंद झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमका कशामुळे हा प्रकार झाला आहे. केंद्र शासनाचे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ यांना माहिती देण्यात आली. गावालगत जमिनीत भेगा पडल्या आहेत. यासह अनेक प्रकाराची माहिती समाजमाध्यमांमध्ये येत असल्याने चर्चाना ऊत आला आहे. असा कोणताच प्रकार नसल्याचे समोर आले आहे. मात्र, या परिसरात भूकंपाचा कुठलाच धोका नाही, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दोन दशकांपूर्वी शेंदोळा बु. येथेही प्रकार
शेंदोळा (बु) येथे १८ ते २० वर्षापूर्वी भूगर्भातून हालचाल, आवाज व धक्के जाणवायचे. 'जीएसआय'च्या पथकाने पाहणी केली असता, जमिनीच्या भेगांमधून पाणी भूगर्भातील चुनखडीत शिरले व येथे केमिकल रिअॅक्शन होऊन वायू तयार झाला, बुडबुडे विहिरीच्या पाण्यातून येत व भूगर्भातील स्तरांमध्ये हालचाल व्हायची, असा प्रकार उघड झाला होता.
ऊर्ध्व वर्धाचे 'सिस्मोग्रॉफ' बंदच
४ जून २०२५ रोजी धारणी तालुक्यात शिवझिरी, डाबका, रेहाट्या, नारदू, आदी गावांत ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यापूर्वी ३० सप्टेंबर २०२४ रोजी अमझरी व टेटू गावांत ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. आता शिरजगाव येथे दोन धक्के जाणवले.ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावरील भूकंपमापक यंत्र (सिस्मोग्रॉफ) पाच-सात वर्षापासून बंदच आहे. नवीन यंत्रखरेदीची तयारी प्रकल्प कार्यालयाने केली व प्रस्ताव महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) येथे पाठविला असता त्यांनी तो नाकारल्याची माहिती आहे.
"शिरजगाव येथे दोन धक्के जाणवले आहे. कुठल्याही 'सिस्मोग्रॉफ' वर भूकंपाची नोंद झालेली नाही. या प्रकाराबाबत 'जीएसआय व एनसीएस' संस्थांना अवगत केले आहे. नागरिकांनी घाबरू नये."- अनिल भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी
"गावात मोठे धक्के बसल्याबाबत शिरजगावचे नागरिकांचे फोन आले. लगेच तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला व तत्काळ उपाययोजना करण्याविषयी सांगितले आहे."- यशोमती ठाकूर, माजी मंत्री