अमरावती : काही वर्षांपासून युरिया शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा बनला आहे. आता तर केंद्र सरकारद्वारा पुढील तीन वर्षात रुरिया टप्प्याटप्प्याने नियंत्रणमुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे. असे झाल्यास नियंत्रणमुक्त युरियाची ५० किलोची बॅगस तब्बल ५६८ रूपयांना शेतकऱ्यांना खरेदी करावी लागणार आहे. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. रासायानिक खतेविषयक मंत्रालयाने तयार केलेल्या योजनेत खरीप व रबी हंगामापूर्वी प्रतिवर्षी १० टक्के युरियाची किंमत वाढविली जाणार आहे. सध्या २८४ रूपयांत युरियाची बॅग विक्री होत आहे. यामध्ये ५० टक्के सबसीडी अंतर्भूत आहे. जन धन योजना व आधारकार्डाचा उपयोग करून यासंबंधीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ळे पोहचविण्याची शासनाची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु युरिया खरेदी करतेवेळी दुकानदारास रोख रक्कम द्यावी लागणार आहे. आधीच युरियाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यात किमती वाढल्यास शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभे राहणार आहे. युरियाचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी केंद्र सरकार या प्रस्तावाला मंजुरी देणार असल्याची शक्यता आहे, असे झाल्यास शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. (प्रतिनिधी)
नियंत्रणमुक्त युरिया पोहोचणार ५६८ रुपयांवर!
By admin | Updated: February 15, 2015 00:12 IST