कृषी विभाग : जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, केळीला विम्याचे कवचअमरावती : राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात संत्रा, केळी व मोसंबी पिकासाठी हवामानावर आधारित पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर होती. ती १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगवान वारे व गारपीट यापासून विमा योजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपिकांसाठी निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, हा योजनेचा उद्देश आहे. सन २०१५-१६ मध्ये आंबिया बहार हंगामामध्ये फळपिकासाठी विमा संरक्षण देय राहिल. विविध वित्तीय संस्थांकडे पीककर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसूचित फळपिकासाठी कर्जमर्यादा मंजूर असणाऱ्या कर्जदारांना योजना सक्तीची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. किमान २० हेक्टर किंवा जास्त उत्पादन क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविली जाईल. फळपिकासाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान देय राहणार आहे. (प्रतिनिधी)
फळपीक विम्याला १५ पर्यंत मुदतवाढ
By admin | Updated: December 10, 2015 00:20 IST